Dahisar Kashigaon Metro: 7 एप्रिल रोजी दहिसर-काशीगाव मेट्रोते लोकार्पण झाल्यानंतर 8 एप्रिल रोजी मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. पहिल्याच दिवशी मेट्रोमध्ये सायंकाळच्या वेळी प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: दहिसर-काशीगाव मेट्रो मार्गिकेच्या प्रारंभालाच प्रवाशांनी असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की, पहिल्याच दिवशी या सेवेची खरी कसोटी लागल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासूनच सर्व स्थानकांवर प्रवाशांची वाढती वर्दळ पाहायला मिळाली, तर सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रत्येक मेट्रो गच्च भरून धावत असल्याने नव्या मार्गिकेचा स्वीकार झपाट्याने होत आहे, हे स्पष्ट झाले.
विशेषतः काशीगाव स्थानकावर एग्झिट गेटसमोर लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे व्यवस्थापनासमोरील सुरुवातीची आव्हाने अधोरेखित झाली. मेट्रोमधून उतरलेल्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने, स्थानकाबाहेर पडण्यासाठी काही मिनिटांची प्रतीक्षा करावी लागली. हातात पिशव्या, चेहऱ्यावर घाई आणि पुढे सरकणारी संथ रांग या साऱ्यांमुळे सायंकाळच्या वेळेत स्थानक परिसरात मोठी गर्दी उसळल्याचे चित्र होते.
डब्यांमध्ये उभे राहण्याइतकीच जागा
मेट्रोच्या डब्यांमध्येही ‘हाऊसफुल’चीच परिस्थिती दिसून आली. उभे राहण्याइतकीच जागा उरलेली, हँडल पकडून प्रवास करणारे प्रवासी आणि तरीही वेळेची बचत होत असल्याने चेहऱ्यावर दिसणारे समाधान स्पष्ट जाणवत होते. नव्या मार्गिकेचा अनुभव घेण्यासाठी अनेकांनी मुद्दाम प्रवास केल्याने दुपारनंतर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत गेली.
दरम्यान, काही ठिकाणी स्थानकांची प्रवेशद्वारे तसेच बाहेर पडण्याच्या मार्गांवर प्रवाशांचा वेग मंदावल्याने गर्दीची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज आणि गर्दी नियोजनात सुधारणा आवश्यक असल्याचेही दिसून आले. मात्र, ही सुरुवातीची चाचपणी असल्याने प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पहिल्याच दिवशीची ही गर्दी भविष्यातील वाढत्या वापराची नांदी मानली जात असून, येत्या काही दिवसांत व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन प्रवासाचा अनुभव अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Mumbai Metro 9: दहिसर-काशीगाव मेट्रोला सुरूवात! इंटरचेंजद्वारे कुलाबा, विमानतळापर्यंत प्रवास शक्य; दुसरा टप्पा लवकरच
वेळ वाचल्याचे समाधान
या अडचणी असूनही प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ‘रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कमी वेळेत प्रवास करता येत आहे,’ अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. मिरा-भाईंदर आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी ही सेवा दैनंदिन प्रवासासाठी मोठा दिलासा ठरेल, असा विश्वासही प्रवाशांनी व्यक्त केला.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा