ST Bus Fare Hike: एसटी महामंडळाने 15 एप्रिलपासून बसच्या तिकीट दरांत वाढ होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबईहून राज्यात अनेक ठिकाणी प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: उन्हाळी सुट्टीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने सुट्टीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांवर १० टक्के हंगामी भाडेवाढीसह प्रति तिकिटामागे दोन रुपये असा स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी भाडेवाढ केवळ साध्या गाड्यांना असून स्वच्छता अधिभार सरसकट एसटी गाड्यांना लागू राहणार आहे. सध्या मुंबई-पुणे प्रवासात साध्या एसटीसाठी २८१ रुपये मोजावे लागत आहेत. १५ एप्रिलला हंगामी भाडेवाढीनुसार ३१२ आणि दोन रुपये अधिभार असे एकूण ३१४ रुपये मोजावे लागणार आहेत.
14 एप्रिलपासून नवे दर लागू
राज्य परिवहन प्राधिकरणाने (एसटीए) एसटी महामंडळाला यात्रा, उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या दिवसांत ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सन २०२६च्या उन्हाळी हंगामासाठी १० टक्के प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाडेवाढ १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू होणार आहे. उन्हाळी भाडेवाढ ही केवळ दोन महिन्यांसाठी असून स्वच्छता अधिभार हा कायमस्वरूपी असणार आहे.Mumbai Metro 9: दहिसर-काशीगाव मेट्रोला सुरूवात! इंटरचेंजद्वारे कुलाबा, विमानतळापर्यंत प्रवास शक्य; दुसरा टप्पा लवकरच
एसटी महामंडळाकडे सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे एसटी गाड्यांसह, स्थानके आणि आगार स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रवासी स्वच्छतेसाठी असलेल्या उपक्रमासाठी प्रति तिकीट दोन रुपये स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून अधिभार आकारण्यात येणार आहे.
महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलतधारी प्रवाशांना हा अधिभार लागू असणार नाही. आवडेल तेथे प्रवास योजनेंतर्गत चार आणि सात दिवसांचा पास देण्यात येतो. अशा प्रवाशांसाठी पाच रुपये अधिभार असणार आहे. पास देताना प्रवाशांकडून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे. आगाऊ आरक्षणातून काढलेल्या पासवर स्वच्छता अधिभार असणार नाही. एसटीच्या बसगाड्या भाडेतत्त्वाने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये इतका अधिभार द्यावा लागणार आहे, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
ई-बस गाड्यांना वगळले
१५ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी एसटीची भाडेवाढ लागू होणार आहे. भाडेवाढ केवळ साध्या बसगाड्यांसाठी असेल. भाडेवाढीतून हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी या गाड्यांसह ई-बस गाड्यांना वगळण्यात आले आहे. उन्हाळी हंगामासाठी आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून फरकाची रक्कम प्रवासादरम्यान वसूल करण्याच्या सूचना महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिल्या आहेत.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा