• Sat. Jun 6th, 2026

    Crime News: हरवलेला पती शोधून देतो सांगून मांत्रिकाने विवाहितेला जाळ्यात ओढलं, नातेवाईकांना बाहेर बसवत अत्याचार; धक्कादायक घटना उघड

    Crime News: हरवलेला पती शोधून देतो सांगून मांत्रिकाने विवाहितेला जाळ्यात ओढलं, नातेवाईकांना बाहेर बसवत अत्याचार; धक्कादायक घटना उघड

    Nagpur News: घटनेमुळे पीडिता पूर्णपणे हादरून गेली होती आणि भीतीमुळे काही काळ ती गप्प राहिली. मात्र, काही दिवसांनी धैर्य एकवटत पीडित महिलेने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    हरवलेला पती शोधून देतो सांगून मांत्रिकाने विवाहितेला जाळ्यात ओढलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : नाशिकमधील भोंदू बाबाच्या प्रकरणानंतर आता नागपुरातही अशाच प्रकारची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरवलेल्या पतीचा शोध लावून देण्याचे आमिष दाखवत एका तथाकथित मांत्रिकाने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपी ताहीर रशीद बेग याला अटक केली असून, त्याच्याकडून आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३६ वर्षीय महिला नागपुरात घरकाम करून उदरनिर्वाह करते. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी तिचा पती अचानक कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खूपच खचली होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी ताहीर बेग याने स्वतःला मांत्रिक असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला.

    एका कार्यक्रमादरम्यान आरोपीची पीडितेशी ओळख झाली. त्याने जादूटोणा आणि विशेष पूजा करून तिचा हरवलेला पती परत आणू शकतो, असा दावा केला. सुरुवातीला पीडितेचा विश्वास बसावा म्हणून विविध पूजा आणि विधी करण्यास सांगण्यात आले. काही दिवसांनी आरोपीने ‘विशेष पूजा’ करण्याच्या बहाण्याने तिला एकांतात बोलावले. यावेळी आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांना बाहेर पाठवून तिला धमकावले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर त्यानंतर आरोपीने तिच्या घरी जाऊनही हा प्रकार पुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे.

    या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव परिसरातून त्याला अटक करण्यात आली. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सांगितले की, “पीडितेच्या तक्रारीनंतर त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे.”

    दरम्यान, या घटनेमुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अशा भोंदू व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच, अशा प्रकारच्या फसवणूक आणि अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा