Maharashtra Politics : काँग्रेस पक्षाने बारामतीसोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : उपमुख्यमंत्रिपदावर असताना बारामती येथे झालेल्या विमान अपघातात ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता कमी झाली आहे. कारण काँग्रेस पक्षाने बारामतीसोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. आता काँग्रेस कोणाला रिंगणात उतरवणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सुनेत्रा पवार बारामतीतून रिंगणात
बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदारपदी विराजमान झाल्या. मात्र महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवताना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्या अजित दादांच्या बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
शरद पवारांचा सूनबाईंना पाठिंबा
दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने लढवल्या होत्या. बारामतीत सुनेत्रा पवार उमेदवारी करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अद्याप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका समोर आली नाही. परंतु वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष काँग्रेसला पाठिंबा देण्याचे संकेत आहेत.
बिनविरोध निवडणुकीची शक्यता मोडली
लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली आणि दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी दिली, तर बिनविरोध निवडणूक करण्याची राजकीय संस्कृती महाराष्ट्रात जपली जात होती. मात्र गेल्या काळात या परंपरेला छेद दिल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळालंय. आताही अजितदादांसारख्या ताकदवान नेत्याच्या कुटुंबातील सदस्य, उपमुख्यमंत्री असलेल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बालेकिल्ला बारामतीतच शड्डू ठोकून काँग्रेसने मोठे धाडस दाखवले आहे.
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येत्या ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात “घोंगडी बैठकांना” सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा