• Thu. Jun 18th, 2026

    Maha-Sadhana Saptaah: 2 ते 8 एप्रिलदरम्यान राज्यात ‘महा-साधना सप्ताह’; 8.8 लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांची डिजिटल कौशल्यवृद्धी मोहीम

    Maha-Sadhana Saptaah: 2 ते 8 एप्रिलदरम्यान राज्यात ‘महा-साधना सप्ताह’; 8.8 लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांची डिजिटल कौशल्यवृद्धी मोहीम

    2 ते 8 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना चार तासांचे समर्पित डिजिटल प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राज्य प्रशासन अधिक सक्षम, तंत्रज्ञानस्नेही आणि कार्यक्षम बनविण्यासाठी 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत ‘महा-साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा हा उपक्रम शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

    कोणत्या पोर्टलवर सेवा?

    केंद्र शासनाच्या सूचनांनंतर राज्यातही या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, ‘टेक लर्निंग वीक’ अंतर्गत तब्बल 8.8 लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. सात दिवसांच्या या उपक्रमात प्रत्येकाने iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करून किमान चार तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे एकूण 35 लाखांहून अधिक शिकण्याचे तास निर्माण होण्याची अपेक्षा आहे.राज्यातील 36 जिल्हे, 32 विभाग आणि 6 विभागीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी या सप्ताहात सहभागी होणार असून, प्रशासनाच्या सर्व स्तरांवर हा उपक्रम राबविला जाणार आहे. ‘मिशन कर्मयोगी’चा भाग असलेला हा कार्यक्रम पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात असून, कामकाजावर परिणाम न होता कौशल्यवृद्धी साध्य करण्यावर भर देण्यात आला आहे.

    काय आहे उद्दिष्ट?

    या प्रशिक्षणाद्वारे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कामाशी संबंधित नवीन तंत्रज्ञान, कौशल्ये आणि कार्यपद्धती आत्मसात करणार आहेत. डिजिटल गव्हर्नन्सला चालना देणे, वेळ व्यवस्थापन सुधारणे, तसेच नागरिककेंद्रित सेवा अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनविणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

    सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. iGOT Karmayogi Appच्या माध्यमातून आपल्या सोयीच्या वेळेत प्रशिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध असल्याने, काम आणि शिक्षण यामध्ये संतुलन राखणे शक्य होणार आहे. या सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना iGOT पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे मे महिन्यात होणाऱ्या ‘TECH-वारी 2.0’ कार्यक्रमात प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

    बदलत्या काळात प्रशासनाला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी डिजिटल कौशल्ये आणि सतत शिक्षण अत्यावश्यक ठरत आहे. ‘महा-साधना सप्ताह’ हा त्याच दिशेने उचललेला एक महत्त्वाचा आणि दूरदृष्टीचा निर्णय ठरत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा