• Sun. Jun 7th, 2026
    फडणवीसांचा आग्रह, ‘मेट्रो वुमन’ होणार BMC आयुक्त, शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर अश्विनी भिडेंचा मार्ग मोकळा

    BMC Commissioner : अश्विनी भिडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेत अर्धा तास चर्चा केली. यानंतर भिडे यांचा आयुक्तपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाची नियुक्ती करावी, या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये प्रामुख्याने अश्विनी भिडे , मिलिंद म्हैसकर आणि असीम गुप्ता यांच्या नावाची चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर अश्विनी भिडे यांनी शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेत अर्धा तास चर्चा केली. या भेटीगाठींनंतर भिडे यांचा आयुक्तपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते.

    भूषण गगराणी सेवानिवृत्त

    मुंबई महापालिका आयुक्तपदाच्या शर्यतीत प्रामुख्याने अश्विनी भिडे, मिलिंद म्हैसकर आणि असीम गुप्ता या तिघांची नावे आघाडीवर होती. याविषयी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. मात्र, नाव निश्चित ठरले नव्हते. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे आज, मंगळवारी सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त होणाऱ्या या पदावर कोणाला नेमायचे, याविषयी रस्सीखेच सुरू आहे.
    Maharashtra TimesAditi Tatkare : राष्ट्रवादीच्या पोस्टरवर अजितदादा-सुनेत्रा पवारांचा फोटो गायब, टीकेनंतर आदिती तटकरे म्हणाल्या, फोटोतून आमची निष्ठा ठरवू नका

    फडणवीसांचा आग्रह

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अश्विनी भिडे यांच्या नावासाठी, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. मात्र, सोमवारी रात्री आधी फडणवीस-शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर भिडे यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन अर्धा तास चर्चा केल्यानंतर आयुक्तपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

    नीलम गोऱ्हे दोनदा अशोक खरातच्या ऑफिसला गेल्या, तृप्ती देसाईंची कारवाईची मागणी

    Maharashtra TimesMaharashtra Politics : एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन तुतारी’, दिल्ली दौऱ्यानंतर हालचाली, शरद पवारांचे खासदार शिवसेना प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा

    कोण आहेत अश्विनी भिडे?

    अश्विनी भिडे या १९९५च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून, त्यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. शिवाय त्या मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यांच्या कामकाजाची दखल घेत त्यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक केले आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष भाजपसोबत सत्तेत असल्याने त्यांच्या मतालाही विशेष महत्त्व दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि शिंदे यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा