भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं राजीनाम्यात म्हटलं आहे.
विरोधकांचा वाढता दबाव आणि पक्षांतर्गत नाराजी
भोंदू बाबा अशोक खरातला ‘गुरू’ मानणे रूपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका होत होती. पक्षातील अनेकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे केली होती. अखेर वाढता दबाव लक्षात घेता, चाकणकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
सुनेत्रा पवारांना लिहिलेल्या पत्रात मांडली भूमिका
रूपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा.” राजीनाम्यासोबतच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ही सर्व परिस्थिती वेदनादायक असल्याचे नमूद केले.
Beed Accident : कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी आणि मुलाचा कार अपघात, माय-लेकाचा होरपळून मृत्यू
“माझा गैरकृत्यांशी कोणताही संबंध नाही”
चाकणकर यांनी पत्रात पुढे म्हटले की, “खरात प्रकरणाबाबत मी पहिल्या दिवसापासूनच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात माझा दुरान्वये संबंध नाही. आजही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि तपासादरम्यान या सर्व बाबी स्पष्ट होतीलच. कोणतेही पुरावे नसताना केवळ माध्यमांमधून होणारे खोटे आरोप वेदनादायक आहेत. सत्य लवकरच सिद्ध होईल.” या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे यापूर्वीच केली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकर यांनी आपली बाजू मांडली होती. “मी अशोक खरातला गुरू मानले हे खरे आहे, मात्र त्याच्या कृत्यांची मला कल्पना नव्हती. जेव्हा हे सर्व समजले, तेव्हा त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती,” असे त्यांनी स्पष्ट केले. आपण महिला असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य करून बदनाम केले जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आता सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर चाकणकर यांनी पक्षीय पदाचाही त्याग केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर पक्ष नेतृत्व सुनेत्रा पवार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
