• Fri. Sep 18th, 2026

Nagpur News : मैकबेथने खऱ्या मित्राला संपवलं, हे शेक्सपियरचं नाटक नाही, वास्तव आहे, आनंदात एकत्र दारु प्यायले अन् जीव घेतला

विलियम शेक्सपियरचं एक मैकबेथ नावाचं प्रसिद्ध नाटक आहे. या नाटकात मैकबेथ नावाचा सेनापती हा त्याच्या घरी आलेल्या राजाचा जीव घेतो आणि राजाच्या गादीवर बसतो. पुढे तो आपल्या जवळच्या मित्रांचा जीव घेतो. ही घटना सांगण्यामागचं कारण म्हणजे नागपुरात तीन मित्रांनी आपल्या चौथ्या मित्राचा विश्वासघात करत त्याला संपवलं आहे. त्याला संपवण्यासाठी त्यांनी आधी त्याच्यासोबत आनंदाने दारुची पार्टी केली. ते बारमध्ये गेले. त्यानंतर बारमधून बाहेर पडत त्याच्यासोबत वाद घालत हाणामारी केली आणि त्याला निर्घृणपणे संपवलं.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूरच्या इतवारी परिसरात रेती व्यावसायिकाची दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी मित्रांनीच या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी रात्री दारू पार्टी केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मनीष ऊर्फ मन्या चंद्रशेखर मोहिते असे मृतकाचे नाव आहे.

रविवारी सकाळी इतवारीतील धारस्कर रोडवरील कसार भवनसमोर असलेल्या एका चहाच्या टपरीत लोखंडी टेबलवर रक्ताच्या थारोळ्यात मनीषचा मृतदेह आढळून आला. चहाच्या टपरीचे मालक अमित पौनीकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मनीष हा तुमसर परिसरात रेतीचा व्यवसाय करत होता. शनिवारी रात्री मनीष त्याचे मित्र निखिल चव्हाण, कुणाल झाडे आणि विनय ऊर्फ डालू पौनीकर यांच्यासोबत बारमध्ये बसला होता. त्यानंतर मनीषने त्याचा भाऊ रोशन ऊर्फ गोलू मोहिते याला झेंडा चौकातील व्हाइट हाउस बारमध्ये बोलावले. बारमध्ये एकत्रितपणे दारू पिल्यानंतर सर्वजण दुचाकीवरून बाहेर पडले.

दारू पार्टी संपल्यानंतर मनीष आणि तीनही आरोपी गांधीबाग परिसरात गेले. तिथे जुन्या वादाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. काही वेळाने हे सर्वजण इतवारी परिसरात पोहोचले. इथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याचदरम्यान आरोपींनी मनीषवर दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. हल्ला इतका भीषण होता की, मनीषचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?

रविवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. हत्येचा छडा लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी विविध पथकांना तपासात सहभागी केले. त्यानंतर सायबर सेलने तांत्रिक तपास सुरू केला. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सिंबा, नेटग्रिड, एआय तंत्रज्ञान तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला.

विविध तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून मनीषसोबत असलेल्या संशयितांच्या हालचाली तपासण्यात आल्या. या तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींची घेराबंदी केली. त्यानंतर कुणाल झाडे, विनय ऊर्फ डालू पौनीकर आणि निखिल चव्हाण या तिघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान जुन्या वादातून मनीषची हत्या करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, या हत्येमागील नेमका जुना वाद काय होता? याचा तपास अद्याप सुरू आहे.

हत्या करण्याचा कट नेमका कधी आणि कुठे रचण्यात आला? हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली धारदार शस्त्रे आणि इतर साहित्य कुठून आणण्यात आले? याचा तपास तहसील पोलिसांकडून केला जात आहे. तसेच या हत्येमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.