• Sun. Jun 14th, 2026

    लोकचळवळीने महाराष्ट्र व्यसनमुक्त करूया – मंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 25, 2026
    लोकचळवळीने महाराष्ट्र व्यसनमुक्त करूया – मंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    मुंबई, दि. २५: नवी पिढी ही देशाची संपत्ती आहे. मात्र, काही तरुण व्यसनामध्ये गुंतले आहेत. तरुण पिढीला व्यसनामुळे बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. यासाठी राज्यभर लोकचळवळ उभी करून महाराष्ट्र व्यसनमुक्त करूया, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले.

    सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने 2020 ते 2025 या काळात व्यसनमुक्तीसाठी उत्कृष्ट काम केलेल्या संस्था, व्यक्ती यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यानिमित्त आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. व्यसनमुक्ती दिंडीला मंत्री शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे हिरवा झेंडा दाखवला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, स्मिता अंबावडेकर यांच्यासह राज्य नशामुक्ती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

    मंत्री शिरसाट म्हणाले की, व्यसनमुक्त दिंडीचा थेट कार्यक्रम होत असल्याने समाजातील इतर घटक, युवक स्फूर्ती घेतील. व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांच्या मनामध्येही काहीतरी करण्याची इच्छा निर्माण व्हावी. याचप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त संस्था, व्यक्तींचे कार्य महाराष्ट्रभर जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

    युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. आपण शिक्षणामध्ये आघाडीवर आहोत, मात्र व्यसनाधीन होऊ नका, युवकांना संदेश देत नशामुक्त भारत अभियानामध्ये भाग घेऊन महाराष्ट्र नशामुक्तमध्ये प्रथम क्रमांकावर राखण्याची ग्वाही प्रधान सचिव कांबळे यांनी दिली.

    व्यसनमुक्त दिंडीमध्ये ढोल पथक, लेझीम पथक, वारकरी, कोळी बांधव, व्यसनमुक्त पुरस्कारार्थी, एनएसएस विद्यार्थी, ब्रह्माकुमारी, तृतीय पंथीय समूह सामील झाले होते. एक दो एक दो, दारू-तंबाखू छोड दो, व्यसनमुक्त महाराष्ट्र झालाचं पाहिजे, अशा घोषणा देत दिंडी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचली. यावेळी नशामुक्ती संघटनेचे मुख्य समन्वयक अमोल मडावी यांनी नशामुक्तीची शपथ दिली.

    यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या व्यसनमुक्तीबाबतच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री शिरसाट यांच्या हस्ते झाले.

    महाराष्ट्र शासनाचा हिरकणी पुरस्कारप्राप्त देवयानी रॉकिंग गर्ल्स आणि नशाबंदी मंडळ आयोजित व्यसनमुक्तीचा ऑर्केस्ट्रा यावेळी सादर करण्यात आला.

    ०००

    धोंडीराम अर्जुन/स.सं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed