• Wed. Jun 17th, 2026

    साताऱ्याच्या सत्तानाट्यात आता नवा ट्विस्ट, ज्यांची अपहरणाची तक्रार झाली तेच बापू शिंदे पोलीस ठाण्यात दाखल

    साताऱ्याच्या सत्तानाट्यात आता नवा ट्विस्ट, ज्यांची अपहरणाची तक्रार झाली तेच बापू शिंदे पोलीस ठाण्यात दाखल

    साताऱ्याचे सत्तानाट्य संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. बापू शिंदे यांचे अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. पण ते स्वत: आज पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि आपले अपहरण झाले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : राज्यभर गाजत असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तानाट्यात ज्यांच्या अपहरणाची तक्रार झाली होती ते जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे आज राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्यासोबत थेट स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) दाखल झाले. माझे अपहरण झाले नव्हते. माझा तक्रारदार मुलगा माझ्याजवळ राहत नाही, असा ‘इन कॅमेरा’ जबाब त्यांनी नोंदवला. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून गुन्हाच रद्द करण्याची वेळ पोलिसांवर येऊ शकते, अशी चर्चा कायदेतज्ज्ञांमध्ये आहे.

    सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची 20 मार्चला झालेली निवडणूक वादळी ठरली. पोलिसांनी केलेल्या धरपकड, अटकसत्र आणि धक्काबुक्कीमुळे साताऱ्याच्या प्रशासनाची लक्तरे राज्याच्या वेशीवर टांगली गेली. त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवड प्रक्रियेत सातारा पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या दोन सदस्यांना अटक केली. ज्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल होती त्या बापू शिंदे यांना जबाब नोंदविण्यासाठी आज हजर राहण्यास सांगितले होते.

    बापू शिंदे यांनी जबाबात काय म्हटलं?

    राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार नितीन पाटील आणि काही कार्यकर्त्यांसह बापू शिंदे सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांचा जबाब इन कॅमेरा नोंदवण्यात आला. जबाबात त्यांनी म्हटलंय की, माझे अपहरण झालेले नाही, असे मी लेखी दिले होते. तरीही खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. हे एक प्रकारचे कटकारस्थान आहे. यासंदर्भात तक्रार करणारा माझा मुलगा आहे आणि तो माझ्याजवळ राहत नाही. त्याने दबावाखाली तक्रार दिली असावी.

    नितीन पाटील काय म्हणाले?

    खासदार नितीन पाटील यांनी देखील पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. ते म्हणाले की, मतदान प्रक्रियेत काही सदस्य सहभागी होऊ नयेत, यासाठी हेतूपूर्वक दोन वेळा गुन्हे दाखल करून संबंधित सदस्यांना अटक करण्यात आली. हा गुन्हा जबरदस्तीने दाखल करण्यात आला असून हे प्रकरण संशयास्पद आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून सदस्य फोडण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणामागील मास्टरमाईंडचा शोध घेण्यात यावा. संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

    दरम्यान, अपहरणाची तक्रार करणारा विकास शिंदे हा बापू शिंदेंचा मुलगा आहे. त्यालाही 24 तास पोलिसांनी ताब्यात ठेवले होते. त्यामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आणि संशयास्पद होती. सातारा जिल्हा परिषदेत विशिष्ट राजकीय पक्षाची सत्ता येऊ नये, यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप नितीन पाटील यांनी यावेळी केला. निवड प्रक्रियेची वैध बाजू तपासून फेरनिवडीच्या संदर्भाने न्यायालयीन प्रक्रियेत दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा