• Sun. Aug 2nd, 2026
    Satara Politics : शंभूराज देसाईंना शिवेंद्रराजे भोसले यांचे प्रत्युत्तर, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर साताऱ्यात महायुतीत तणाव

    सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर आता महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. महायुतीच्या मंत्र्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पाच सदस्यांची फोडाफोडी करून भाजपने सातारा जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला. त्यावेळचा हाय व्होल्टेज ड्रामा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. मात्र, त्यानंतर महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाला हाताशी धरून भाजपने लोकशाहीचा मुडदा पाडल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केला होता. त्याला भाजप नेत्यांनी आज प्रत्युत्तर दिलं. अध्यक्षपदाची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने झाली आहे. लोकशाहीचा गळा घोटलेला नाही. अपयश झाकण्यासाठी पालकमंत्री खोटे आरोप करत आहेत, असे स्पष्टीकरण शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहे.

    शंभूराज देसाईंचे गंभीर आरोप

    जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकी दिवशी जिल्हा परिषद साध्या वेशातील पोलिसांनी भरली होती. राष्ट्रवादीच्या सदस्याचे अपहरण केल्याची खोटी फिर्याद गुरूवारी रात्री दाखल करण्यात आली. त्यासंदर्भात स्वतः सदस्याने पोलीस ठाण्यात हजर होऊन आपला जबाब नोंदवला. त्यानंतर निवडणुकी दिवशी सकाळी फिर्याद दिली. त्यात अनिल देसाई, संदीप मांडवे या दोन जिल्हा परिषद सदस्यांसह इतर दोघांची नावे घातली. आम्ही ते दोन सदस्य आणि कामेश कांबळे यांना घेऊन जात असताना पोलिसांनी बळाचा वापर करून देसाई आणि मांडवेंना ताब्यात घेतले. तर कामेश कांबळेला मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दम दिला. जिल्हा परिषदेची काहीही संबंध नसताना त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि नगरसेवक फिरोज पठाण यांनी कामेशला आमच्या ताब्यातून बाजूला नेल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केला होता.

    पोलिसांकडून मंत्र्यांना धक्काबुक्की

    जिल्हा परिषदेत साध्या वेशातील शेकडो पोलीस होते. त्यांनी मी पालकमंत्री असताना माझ्यासह मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना मागे रेटले आणि धक्काबुक्की केली. सभागृहाच्या बाहेरच पोलिसांनी सदस्यांना ताब्यात घेतले. प्रशासनाला हाताशी धरून भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे. सत्तेच्या जोरावरची दादागिरी, मग्रुरी आणि माज दाखवला असल्याची जोरदार टीका देखील शंभूराज देसाईंनी केली होती. तसेच या निवडी विरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

    निवड प्रक्रिया लोकशाही पद्धतीनेच

    भाजप नेत्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. लोकशाही पद्धतीनेच भाजपची सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाली आहे. राजकीय अपयश झाकण्यासाठी पालकमंत्री खोटे आरोप करत असल्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. भाजपचे वरिष्ठ नेते या निवड प्रक्रियेपासून चार हात लांब होते. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम इथे अजिबात झाले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

    पोलिसांनी गुन्ह्याची चौकशी करणे गैर नाही

    विरोधक जर जिंकले तर ती लोकशाही आणि भाजप जिंकला तर ती दांडगाई. हा कुठला न्याय, असा सवाल शिवेंद्रराजेंनी विरोधकांना केला. आमच्या कोणत्याही मंत्र्यांचे वाहन जिल्हा परिषदेच्या आवारात नव्हते. आमच्या विचाराचे काही सदस्य शिवसेना आणि राष्ट्रवादीने दबावाखाली ठेवले होते. सभागृहात ज्या सदस्यांनी आम्हाला मतदान केले ते जर त्यांच्याशी एकनिष्ठ होते तर मतदान आम्हाला का केले? याचा अर्थ दबाव त्या सदस्यांवर होता. निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करायचा नाही म्हणून आमच्यापैकी कोणीच तेथे नव्हते. मात्र, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याच गाड्या जिल्हा परिषदेच्या आवारात होत्या. काही सदस्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची पोलिसांनी चौकशी केली तर त्यामध्ये काहीही गैर केले नसल्याचे शिवेंद्रराजेंनी सांगितले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा