• Tue. Jun 9th, 2026

    Thane Gas Shortage: ठाणे महापालिका मुख्यालयाचे उपहारगृहसुद्धा ‘गॅस’वर; महापौरांनी तातडीची बैठक घेत प्रशासनाला दिले निर्देश

    Thane Gas Shortage: ठाणे महापालिका मुख्यालयाचे उपहारगृहसुद्धा ‘गॅस’वर; महापौरांनी तातडीची बैठक घेत प्रशासनाला दिले निर्देश

    Thane News: उपहारगृहात बाहेरून तयार खाद्यपदार्थ आणून केवळ इंडक्शन शेगडीवर गरम करून पुरवले जात होते. तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दालनातही कोणतेही पदार्थ पाठवताना अडचणी येत असून येत्या काळात हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

    ठाणे महापालिका मुख्यालयाचे उपहारगृहही ‘गॅस’वर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे: चमचमीत मिसळ…गरमागरम बिर्याणी…चहा – कॉफी अशा सर्वच खाद्यपदार्थ आणि पेय बनवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या उपहारगृहात गॅस नसल्याने येथील अधिकारी-कर्मचारी हवालदिल झाले आहेत. पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुडवड्याचा फटका उपहारगृहाला बसला आहे. अशा परिस्थितीमध्ये इंडक्शन शेगडीवर तात्पुरत्या स्वरूपात अधिकारी – कर्मचाऱ्यांची भूक भागवली जात आहे. ठाणे शहरातील गॅस तुटवड्याप्रश्नी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी तातडीची बैठक घेत प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

    पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात घरगुती गॅस पुरवठ्यावर तूर्तास कोणताही परिणाम झाला नसल्याचा निर्वाळा ठाणे प्रशासनाने दिला आहे. मात्र व्यावसायिक ठिकाणी इंधन पुरवठा मर्यादित असल्याने हॉटेल, उपहारगृहाचे चालक – मालक चिंताग्रस्त आहेत. पालिका मुख्यालयातही कामानिमित्ताने येणारे नागरिक तसेच कर्तव्यावर हजर असणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाश्ता, जेवण, चहा व कॉफी उपहारगृहातून दिली जाते. नागरिकांना मुख्यालयाच्या तळमजल्यावर उपाहारगृहात बसून जेवणाची सोय आहे. तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या दालनात उपहारगृहातून खाद्यपदार्थ, चहा व कॉफी पाठवली जाते. मात्र गॅसच्या तुडवड्यामुळे शुक्रवारी या पुरवठ्यावर परिणाम झाला.

    चहा, कॉफीची तहान शीतपेयांवर
    चहा, कॉफी बनवण्यासाठी गॅस नसल्याने दालनात गरम पाण्याच्या किटलीचा वापर करून ग्रीन अथवा ब्लॅक टी देणे, तसेच उन्हाच्या झळांचा विचार करता शीतपेय, बाहेरील खाद्यपदार्थांच्या पार्सल सेवेवर लोकप्रतिनिधी, अधिकारी – कर्मचारी अवलंबून आहेत.

    आढावा बैठकीत निर्देश
    शहरातील या गॅसप्रश्नांवर ठाणे महापालिका प्रशासनाची महापौर आढावा बैठक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठक घेतली. यावेळी प्रशासनाला ही परिस्थिती योग्यरित्या हाताळण्याचे निर्देशही महापौर पिंपळोलकर यांनी दिल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा