• Sat. Jun 6th, 2026
    आमचे पैसे आम्हाला द्या! थकीत रकमेप्रकरणी BMC एमएमआरडीए, म्हाडापुढे हतबल; कुणाकडे, किती थकबाकी?

    BMC : महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी निधीची आवश्यकता असून त्यामुळे मालमत्ता कराची थकीत रक्कम त्वरित भरण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावे, असे पत्र महापालिकेने एमएमआरडीए, म्हाडाला पाठवले.

    मुंबई महापालिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांकडे असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम वसूल करण्यात मुंबई महापालिकेला अपयशच येत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या मुंबई महापालिकेने थकबाकीसाठी एमएमआरडीए, म्हाडाला पत्र पाठवले आहे.

    एमएमआरडीएकडून १,६८५ कोटी रुपये आणि म्हाडाकडून मुंबई महापालिकेला ६०१ कोटी रुपये थकीत असलेली मालमत्ता कराची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे ही रक्कम मिळवण्यासाठी महापालिकेला पत्रव्यवहार करावा लागत आहे. मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. कर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महापालिकेकडून ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. मात्र गेल्या १० ते १५ वर्षांत मालमत्ता कर न भरणाऱ्यांची यादी कमीच होत नाही.

    Maharashtra TimesSunetra Pawar: रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप, राजीनामा दिला, आता पुढे काय? वादंगावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
    या काळात विविध प्राधिकरणांकडून एकूण ११ हजार कोटी रुपये मालमत्ता कर महापालिकेला येणे बाकी आहे. यामध्ये एमएमआरडीएची १, ६८५ कोटी आणि म्हाडाची ६०१ कोटी रुपये थकीत रक्कम आहे. म्हाडाच्या एकूण ३,६३६ मालमत्ता आणि एमएमआरडीएच्या १२८ मालमत्ता असून त्यांच्याकडून हा मालमत्ता कर आलेला नाही. म्हाडाच्या एकूण थकीत मालमत्ता करामध्ये ३७९ कोटी रुपये मूळ मालमत्ता कर असून २२२ कोटी रुपये दंड आहे. तर एमएमआरडीएच्या एकूण मालमत्ता करामध्ये ९४६ कोटी रुपये मालमत्ता कर असून ७३९ कोटी रुपये दंड आहे. दंड आकारूनही दोन्ही प्राधिकरणे कर भरत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा थकीत कर मिळावा यासाठी महापालिकेने म्हाडाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी, तर एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

    पत्रात एकूण मालमत्ता आणि थकीत रक्कम नमूद करताना दंडही नमूद केला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून त्यासाठी निधीची गरज आहे. त्यामुळे थकीत रक्कम त्वरित भरावी आणि त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. या पत्राची दखल न घेतल्यास येत्या काही दिवसांत दुसरे पत्रही पाठवून मालमत्ता जप्तीबाबत इशारा देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षीही महापालिकेने म्हाडा, एमएमआरडीएला पत्र दिले होते. त्यानंतरही मोठी थकीत रक्कम भरण्यास दोन्ही प्राधिकरणांनी रुची दाखवलेली नाही.

    Maharashtra TimesMumbai Mega Block: रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! प्रभादेवी पूल पाडण्यासाठी विशेष ब्लॉक; मेल-एक्स्प्रेस उशिराने धावणार, कसं आहे नियोजन?
    ६ हजार मालमत्तांवर बडगा
    थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण सहा हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी, तर ४८३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर, एकूण २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित आहे. दरम्यान, जप्तीची कारवाई सुरू होताच एकूण दोन हजार ८८८ मालमत्ताधारकांनी करभरणा केला आहे.

    कुणाकडे, किती थकबाकी?

    एमएमआरडीए १, ६८५
    कोटी म्हाडा ६०१ कोटी