• Sat. Jun 6th, 2026
    Jalna News : लग्न होत नसल्यानं नैराश्यात, तरुणाचं टोकाचं पाऊल; कर्ता लेक गेल्यानं कुटुंबासह गावात हळहळ

    Jalna Bhokardan Youth Ended his Life : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशातच जालनामधील भोकरदन तालुक्यात एक मोठी घटना समोर आली आहे. एका युवकाचं नैराश्यात आपलं आयुष्य संपवलं आहे.

    लग्न होत नसल्याने तरुणाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा येथे एका 35 वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल शुक्रवारी घडली आहे. गणेश एकनाथ तांगडे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. त्याच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे.

    काल मृत्यूशी झुंज अपयशी

    मिळालेल्या माहितीनुसार, वडोद तांगडा येथे अल्पभूधारक तरुण शेतकरी गणेश एकनाथ तांगडे याने 2 दिवसापूर्वी त्याच्या राहत्या घरी रात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केलं. सदरची बाब ही शेजारच्यांच्या व त्याच्या आईच्या लक्षात येताच आरडाओरड करत त्यांनी गणेशला तात्काळ गावातील एका खासगी रुग्णालयात नेलं. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून त्याला तात्काळ बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी नेण्याच्या सूचना केल्या. त्यावरून तात्काळ त्याला बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याठिकाणी त्याच्यावर दोन दिवस डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, प्रयत्न अपयशी ठरले आणि काल शुक्रवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गणेश तांगडे याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
    Maharashtra TimesSunetra Pawar: रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप, राजीनामा दिला, आता पुढे काय? वादंगावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

    काही वर्षापूर्वी वडिलांचं निधन

    गणेश हा अत्यंत हुशार चाणक्य कर्ता शेतकरी होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर संपूर्ण संसाराचं ओझं आईवर पडलं. एक मुलगा आणि दोन मुली असा संसार घेऊन ती माय माऊली आपल्या संसाराचा गाडा हाकत होती. कशीबशी दोन मुलींची लग्न या माय माऊलीने केले, आणि गणेश हा आपल्या संसाराचे स्वप्न बघू लागला. मात्र, काही दिवसांनी त्याला व्यसन लागलं. या व्यसनाचं कारण म्हणजे एकटेपणा, कित्येक वर्षापासून त्याची आई व स्वतः गणेश लग्नासाठी मुलगी बघत होता. मात्र, जमीन कमी, कुठलीही नोकरी नाही आणि हातात कामधंदा नाही अशी कारण देत त्याला कोणीही मुलगी देत नव्हतं.

    आपलं लग्न होत नसल्यानं गणेश तांगडे हा नैराश्यात गेला अन्; आणखी व्यसनाधीन होत गेला. या नैराश्यात त्याने दोन दिवसापूर्वी आपल्या राहत्या घरीच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या आईने व आसपासच्या शेजाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी दोन दिवस शर्तीचे प्रयत्न केले, मात्र प्रयत्न अपयशी ठरले व त्याची प्राणज्योत मालवली.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यातील दोन खुनांची रहस्यं 21 महिन्यांनी उलगडली, बिबट्याच्या पायाचे ठसे उमटवून भास, तरुणाला अटक

    मराठा महासंघाचे मराठा तरुणांना आवाहन…

    दरम्यान, या घटनेवर बोलताना मराठा महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी म्हटलं आहे की, ‘सदरची घटना ही दुःखद घटना आहे. त्या माय माऊलीच्या पाठीशी मराठा महासंघ नेहमी उभा राहील. आपल्या समाजानेही होतकरू मुलांना आपल्या मुली द्याव्या, जेणेकरून गणेश तांगडेसारखी वेळ कोणावर येणार नाही. जर गणेशला गोरगरीब आपल्या समाजातील कोणीही मुलगी दिली असती तर त्याने चांगला संसार केला असता. कुठलाही माणूस जन्मताच व्यसन घेऊन जन्मत नाही. त्यामुळे ही मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचं आहे की, मुलीला नवरा हा नोकरीवालाच पाहिजे. गाव पातळीवर व विशेष करून ग्रामीण भागात तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे व उद्योग व्यवसायाकडे वळावे, असं आवाहन यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी समाज बांधवांना केलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा