Satara Zilha Parishad Election: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संख्याबळ कमी असल्याने भाजपचा पराभव होण्याची शक्यता होती. मात्र मर्यादित संख्याबळ असताना असतानाही भाजपने बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर गाठली.
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६५ जागा असल्याने बहुमतासाठी ३३ जागांची आवश्यकता होती. मात्र भाजपच्या २८ जागा निवडून आल्या होत्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं २० आणि शिंदेंच्या शिवसेनेनं १५ जागांवर विजय मिळवलेला होता. या दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपविरोधात या आघाडीचे संख्याबळ ३५ पर्यंत जात होते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव नक्की मानला जात होता. परंतु २८ सदस्यांपर्यंतचे मर्यादित संख्याबळ असताना असतानाही भाजपने बहुमतासाठी लागणारा जादुई आकडा गाठला.
फडणवीसांचा फोन, शिवेंद्रराजेंच्या हालचाली!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर भाजप नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अचूक रणनीती आखली आणि अतिरिक्त पाठिंबा मिळवत एकूण ३३ सदस्यांचा पाठिंबा भाजपाच्या बाजूने उभा केला. त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलली आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. बहुमत प्राप्त केल्याने भाजपच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड, तर उपाध्यक्षपदी भाजपच्याच राजू भोसले यांची निवड निश्चित झाली.
दरम्यान, या राजकीय नाट्यानंतर सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपाचा भगवा फडकला असून, यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
