Mumbai Local Ticket: यूटीएस ॲप बंद करून रेलवन सुरू झालं आहे. पण ॲपवरील समस्या न सोडवताच वापर बंधनकारक केल्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी आल्या आहेत.
केवळ एक कोटी प्रवाशांकडून पसंती
‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स’च्या (क्रिस) ४०व्या स्थापना दिनानिमित्त १ जुलै २०२५ रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते रेलवन अॅपचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर यूटीएस अॅप टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले. यूटीएस अॅप बंद होण्यापूर्वी सुमारे पाच कोटी प्रवासी या अॅपचा वापर करून तिकीट आणि पास खरेदी करत होते. सध्या रेलवन अॅप केवळ एक कोटी प्रवाशांनी अॅपचा वापर सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
Mumbai Local: मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वेकडून बंद दरवाजांची लोकल, मध्य रेल्वेवर ‘नॉन-एसी’ ट्रेन लवकरच; एप्रिलमध्ये चाचणी
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, रेलवन अॅपमध्ये लॉग इन करताना अडचणी येत आहेत. तसेच वॉलेटमध्ये रक्कम जमा केल्यानंतर मेल-एक्स्प्रेस तिकीट घेताना रक्कम वजा होते, मात्र तिकीट मिळत नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे काही प्रवाशांनी लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.
दहा दिवसांत अनेक तांत्रिक अडचणी
यूटीएस अॅप सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मदत मिळावी यासाठी स्थानकांवर ‘मे आय हेल्प यू’ कक्ष आणि प्रवासी दूत तैनात करण्यात आले होते. मात्र सध्या रेलवन अॅप संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी स्थानकांवर तत्काळ मदत उपलब्ध नसल्याचे प्रवासी सांगत आहेत. मुलुंड येथील प्रवासी गणेश आचरेकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘१ मार्चनंतर रेलवन अॅप डाउनलोड केले. गेल्या दहा दिवसांत अनेक वेळा तांत्रिक अडचणी आल्या. नोंदणी प्रक्रियेतही अडथळे येत होते. सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतरच अॅप अनिवार्य करणे आवश्यक होते,’ असे दहिसर येथील प्रवासी नरेश सावंत यांनी सांगितले.
Mumbai Local: एक-दोन नव्हे तर 238 बंद दरवाजांच्या लोकल मुंबईसाठी! केंद्राकडून 3 हजार कोटींचा आधार; रेल्वे मंत्र्यांची माहिती
तिकीट रांगेतून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी यूटीएस अॅप सुरू करण्यात आले होते. उपनगरी प्रवाशांनी या अॅपला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला होता. सध्या रेलवनमध्ये अडचणी कायम असल्याने पुन्हा तिकीट खिडकीवर उभे राहावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, रेलवनबाबतच्या तक्रारींसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
