• Sat. Aug 1st, 2026

    Pune News: दिल्ली आंदोलनातील दगडांवरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार; धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी

    Pune News: दिल्ली आंदोलनातील दगडांवरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार; धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी

    Shivsena Ravindra Dhangekar: पुण्यात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप असा संघर्ष उफाळून येत असल्याचं दिसत आहे.

    धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजीत दराडे, पुणे : नीट पेपर फुटीनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. याच मुद्द्याला धरून दिल्लीतील जंतर मंतर मैदानात कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातील तरुणांनी जोरदार पाठिंबा दिला होता. याच आंदोलनादरम्यान दिल्लीतील संसद मार्ग परिसरात ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान पोलिसांकडून निष्ठूर लाठीचार्ज करण्यात आला होता. यावरच भाजप नेते आणि राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं एक विधान सध्या कमालीचे चर्चेत आहेत. ‘आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेले होते, त्याच्यावरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार असून त्याआधारे तपास केला जाणार आहे’, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना केले होते. यावरून आता चंद्रकांत पाटील हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. इतकंच नाही तर सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेना नेत्यानेही चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. “वाय झेड सेक्युरिटी असलेल्या माणसाची बुद्धिमत्ता वाय झेड झाल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे चंद्रकांतदादा. अतिशय बुद्धिमान वैज्ञानिकांना सुद्धा प्रश्न पडावा अशी तल्लख बुद्धी चंद्रकांतदादांना लाभली आहे. आमच्या पुणेकरांचे भाग्य आहे की असा आमदार आम्हाला लाभला आहे आणि त्याहून मोठे भाग्य आपल्या राज्याचं आहे की अशी व्यक्ती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहे. माझी विनंती आहे चंद्रकांतदादांनी दगडावरचे फिंगरप्रिंट आधार कार्डला लिंक करून दाखवावे, नाहीतर दादांचा सुद्धा राजीनामा घ्यायला काही हरकत नाही. आपल्या मुलांचे भवितव्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही,” असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांना फैलावर घेतले आहे.

    रवींद्र धंगेकर आणि पुणे भाजपमधील नेत्यांचा संघर्ष तसा जुना आहे. धंगेकर काँग्रेसमध्ये असताना अनेक वेळा हा संघर्ष झाला होता. मात्र पुढे धंगेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हा संघर्ष कमी होईल असा अंदाज बांधला जात होता. परंतु त्यानंतर देखील हा संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळाला आहे. नुकतेच रवींद्र धंगेकर यांच्यावर एका व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र धंगेकर यांनी यामागे नाव न घेता चंद्रकांत पाटील हेच असल्याचे बोलून दाखवलं होतं. इतकंच नाही तर काल झालेल्या महानगरपालिकेवरील आंदोलनादरम्यान सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेत भ्रष्ट कारभार सुरू आहे आणि याचा पैसा कोथरूड मार्गे मुंबईला जात असल्याची टीका केली होती.

    संजय राऊतांनीही चंद्रकांत पाटलांना घेरलं

    चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर रवींद्र धंगेकर हेच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे. “चंद्रकांत पाटील यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आत्तापर्यंत कोणीही लावला नव्हता. दगडावरच्या हातांचे ठसे घेऊन, ते आधार कार्डला लिंक करायचे, आधार कार्डाचा शोध केला ते नंदन निलेकणी जे आहेत, ते हा शोध ऐकून 2 दिवस कोमात गेले, काय करावं ते काही त्यांना सुचत नाही. मला कसं नाही हे समजलं,” असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लागवला आहे.