• Sun. Sep 13th, 2026

दहावी, बारावीच्या परीक्षेतील विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 24, 2026
दहावी, बारावीच्या परीक्षेतील विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव – महासंवाद

मुंबई, दि. २४ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या बालगृह, निरीक्षणगृह आणि खुले निवारा गृहातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा माटुंगा येथील बेहरामजी जीजीभाई होम फॉर चिल्ड्रन्स येथे झाला. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष गुणवंत गौरव व सत्कार सोहळा – २०२६ च्या कार्यक्रमास बाल कल्याण समिती अध्यक्ष महादेव सावंत, मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, बाल कल्याण समिती सदस्य श्याम मिस्त्री, अरुणा काटकर, मुग्धा दांडेकर, उषा गायकवाड यांच्यासह आशियाना फाउंडेशनचे विनोदभाई शाह, ग्रेस फाउंडेशनचे शंकर मुगलखोद, हमारा फाउंडेशनच्या प्रिया शेंडे, ऑल इज वेल फाउंडेशनचे प्रकाश राजन, बी.जे होम संस्थेच्या अधीक्षिका अनघा माळवी, जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते.

बाल कल्याण समितीचे अध्यक्ष महादेव सावंत यांनी प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शिक्षण व करिअर वाटचालीसाठी मोठी स्वप्ने बाळगण्याचे आवाहन केले. महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मर्यादित सुविधांमध्येही जिद्दीच्या जोरावर यश मिळवलेल्या मुलांची ही कामगिरी अतुलनीय असून अशा गौरव सोहळ्यांमुळे मुलांचा आत्मविश्वास अधिक दृढ होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास धरून यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा सन्मान इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या यशामागे संस्थांचे अधीक्षक, शिक्षक, कर्मचारी आणि मार्गदर्शक यांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद करून त्यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. मानवी तस्करीपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याची माहिती देणारी चित्राफित यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे, प्रशस्तीपत्रे आणि शुभेच्छा देऊन त्यांच्या शैक्षणिक यशाचा यथोचित गौरव करण्यात आला. सूत्र संचालन अनिशा गोरे यांनी कले. आभार मुंबई शहर जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अमोल जाधव यांनी मानले.

0000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed