• Fri. Jul 24th, 2026

    जिंतूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 24, 2026
    जिंतूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – महासंवाद

    परभणी, दि. २४ (जिमाका) – शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट, सुलभ आणि प्रभावीपणे पोहोचविणारे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ हे शासनाचे लोकाभिमुख पाऊल आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचत असून प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवून त्यांचे समाधान साधले जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर येथील परभणी रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आज समाधान शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे उदघाटन पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिंतूरचे नगराध्यक्ष प्रताप देशमुख, पंचायत समिती सभापती अयोध्या खिस्ते, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसिलदार शिवाजी मगर, शीतल कच्छवे, सहायक निबंधक बी.एस. नांदापूरकर आदींसह सर्व विभागप्रमुख,  लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशाताई आणि मोठ्या संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.

    शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, महसूल व इतर शासकीय विभागांच्या सेवा सुलभ करणे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तत्काळ निराकरण करणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलनाने शिबीराचे उदघाटन झाले.

    पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ राबविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात हे अभियान उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडले आहे. या अभियानाचा एकच उद्देश आहे, शासनाच्या कोणत्याही योजनेपासून एकही पात्र नागरिक वंचित राहता कामा नये. आज शासन स्वतः नागरिकांच्या दारी जाऊन सेवा देत आहे. महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. एकल महिलांच्या सन्मानपूर्ण आणि सुरक्षित जीवनासाठी स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत असून, त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे.

    शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना’ राबविण्यात येत आहे. यासह अनेक लोकहिताच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने अधिक संवेदनशील, गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करत प्रत्येक गावात, प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवावा. नागरिकांनीही पुढाकार घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा, अस आवाहन पालकमंत्री यांनी केले. दरम्यान, पालकमंत्री यांनी आपल्या भाषणा दरम्यान लाभर्थ्यांशी थेट संवाद साधला. शासनाकडून मिळालेल्या लाभामुळे जीवनात झालेल्या परिवर्तनाबद्दल लाभार्थ्यांनी यावेळी माहिती दिली. शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांचे लाभार्थ्यांनी कौतुक केले.

    जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आपल्या मनोगतात म्हणाले की, “शासनाच्या प्रत्येक लोककल्याणकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ हे त्या उद्देशानेच प्रामुख्याने राबविण्यात येत आहे. शासनाच्या सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी हे अभियान प्रभावी माध्यम ठरत आहे. या अभियानातून जिल्ह्यात अनेक महत्त्वाची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. वर्षानुवर्षे अतिक्रमणामुळे बंद झालेले पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले असून, आता या रस्त्यांचे मजबुतीकरण करून शेतकऱ्यांना बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विकासकामांना यश मिळण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम केल्यास गावांचा विकास अधिक वेगाने होईल.

    महिलांचे सक्षमीकरण हा राज्य शासनाच्या विकास धोरणाचा केंद्रबिंदू आहे. महिला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर कुटुंब, समाज आणि देशाची प्रगती अधिक वेगाने होते. त्यामुळे महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक कुटुंबाने महिलांना मालमत्तेतील समान हक्क देत त्यांच्या नावाची वारसा नोंद आणि सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना पूर्णविराम देणे आवश्यक आहे. मुलींना लहान वयात विवाह न लावता त्यांना उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाची संधी द्यावी. शिक्षित आणि आत्मनिर्भर मुलगी हेच कुटुंबाचे, समाजाचे आणि राष्ट्राचे खरे सामर्थ्य आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासन आपल्या दारी आले आहे; त्यामुळे नागरिकांनीही पुढाकार घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.

    यावेळी  नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी नगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली. तर उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक तहसिलदार शीतल कच्छवे यांनी केले. यावेळी विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजनांतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे बीएलओ यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी शालेय विद्यार्थींनींनी स्वागत गीत गायले. शिक्षक संतोष कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारा पोवाडा सादर केला.

    कार्यक्रमानंतर नागरिकांच्या माहितीसाठी उभारण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉल प्रदर्शनाचे पालकमंत्री यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed