• Mon. Mar 9th, 2026

    Pune Gangwar : पुण्यात पुन्हा टोळी युद्धाचा भडका, वर्चस्वाच्या वादातून गंगाधाम रोडवर मध्यरात्री गोळीबार, तरुण जखमी

    Pune Gangwar : पुण्यात पुन्हा टोळी युद्धाचा भडका, वर्चस्वाच्या वादातून गंगाधाम रोडवर मध्यरात्री गोळीबार, तरुण जखमी

    पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपी पूर्व वैमनस्यातून रेकॉर्डवरील दुसऱ्या एका गुन्हेगारावर गोळीबार करायला गेले. पण त्यांचा नेम चुकला आणि दुसऱ्यात तरुणाला गोळी लागली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडालेला बघायला मिळत आहे. या टोळीयुद्धात शुक्रवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात एका तरुणाच्या पाठीत गोळी लागली. या घटनेमुळे तरुण गंभीर जखमी जाला आहे. पुण्याच्या गंगाधाम रोडवर शुक्रवारी उशिरा रात्री गोळीबाराची थरारक घटना घडली. दोन गटांतील जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी एका तरुणाला लक्ष्य करून पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र नेम चुकल्याने गोळी दुसऱ्याच तरुणाच्या पाठीत लागली. मार्केटयार्ड परिसरातील वखार महामंडळाकडून गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या गोळीबारात मोझेस शेकापूरे उर्फ मोज्या (वय २२, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) हा जखमी झाला. गोळी त्याच्या पाठीत घुसली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

    मिनाताई ठाकरे वसाहतीत बालाजी उमाप, राम उमाप आणि त्यांच्या साथीदारांचा शेकापूरे गटाशी जुना वाद असल्याची माहिती आहे. परिसरात वर्चस्वाच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये यापूर्वीही अनेकदा भांडणे झाली होती. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलांनी हवेत गोळीबार केल्याचा प्रकारही चर्चेत आला होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास बालाजी उमाप आणि अमित शेकापूरे यांच्यात पुन्हा वाद झाला होता. त्यानंतर रात्री अमितचा भाऊ मोझेस शेकापूरे आणि त्याचा मित्र दुचाकीवरून वखार महामंडळाकडून गंगाधामच्या दिशेने जात होते. तेव्हा बालाजी उमाप, राम उमाप आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी दुचाकींवर येत दोघांना रस्त्यात अडवले.

    यावेळी अचानक पिस्तूल काढून गोळीबार करण्यात आला. त्यातील एक गोळी मोझेस शेकापूरेच्या पाठीत लागली आणि तो खाली कोसळला. हा प्रकार घडताच हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

    पोलिसांच्या प्राथमिक तपासात हल्लेखोरांचा मुख्य निशाणा शेकापूरेचा मित्र होता, अशी माहिती समोर येत आहे. मात्र गोळीबारात चुकीच्या व्यक्तीला गोळी लागल्याने शेकापूरे जखमी झाला. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात बालाजी उमाप, राम उमाप आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप पुढील तपास करत आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा