राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आणि सर्व मित्रपक्षांचे आभार मानले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तसेच ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे शरद पवार हे पुन्हा राज्यसभेत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. शरद पवार गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच तब्येत बरी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला होता. पण त्यांना डॉक्टारांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी आज माध्यमांसमोर येवून प्रतिक्रिया न देता ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.
“१९६७ पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले”, असं शरद पवार म्हणाले.
“१९६७ मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले आहे”, असंही शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी जनता आणि मित्रपक्षांचे मानले आभार
“महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे”, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.
“महाराष्ट्राने मला दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझ्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल”, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली.
“सध्या डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे शक्य नसल्याने या पत्रकाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवत आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम, पाठिंबा आणि विश्वास हेच माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा