Titwala Crime News: ‘गाडी हळू चालव’ असं सांगणं एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. ५ ते ६ जणांच्या टोळीने घरात घुसून लोखंडी रॉडने कुटुंबाला बेदम मारहाण केली. टिटवाळ्यात हा संतापजनक प्रकार घडला आहे.
किरकोळ कारणातून मोठा राडा
टिटवाळा परिसरात किरकोळ कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. गाडी हळू चालवा असे सांगितल्याचा राग आल्याने पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर हल्ला करत घराची तोडफोड केली आणि बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मोटारसायकल वेगात चालवल्याने वाद
मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा आंबेकर चौक परिसरातील आर. के. चाळ, राजेश्वरी बिल्डिंगजवळ ही घटना घडली. ५० वर्षीय तक्रारदार झुल्फेकर अली अब्दुल्ला खान हे आपल्या भावांसह फॅब्रिकेशनचे काम करतात. ३ मार्च रोजी ते आपल्या भावांसह घराबाहेर उभे असताना एक तरुण मोटारसायकल वेगात चालवत परिसरातून जात होता. त्यावेळी त्यांनी त्याला येथून गाडी हळू चालवा असे सांगितल्याने वाद निर्माण झाला.
Raigad News: इस्त्रायल-इराण युद्धाचा धसका, पेट्रोल दरवाढीची अफवा; रायगडमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
लोखंडी वस्तूने हल्ला, घराची तोडफोड
यानंतर संबंधित तरुण काही वेळातच आपल्या वडिलांसह आणि इतर साथीदारांना घेऊन घटनास्थळी परतला. त्यांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तूने घराची तोडफोड केली आणि तक्रारदाराच्या डोक्यावर मारहाण केली. तसेच तोंडावर मार लागल्याने दोन दात पडल्याचे तक्रारीत नमूद आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही आरोपींनी ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी पाच जणांविरोधात तक्रार देण्यात आली असून टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
