कुख्यात गुंड सागर मोहळकरवर ७ राऊंड फायरिंग करण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या गोळीबारामागे नेमकं कारण काय याचा शोध घेताना आता विविध कारणं समोर येत आहेत.
‘कानशिलात’ प्रकरणानंतर गोळीबाराचा बदला?
काही दिवसांपूर्वी मोहळकरने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात लगावल्याची घटना चर्चेत होती. या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये तणाव वाढल्याची चर्चा रंगली होती. कालचा गोळीबार हा त्याच वादाचा परिणाम तर नाही ना, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
जिममधील राड्याचा CCTV समोर
मोहळकरच्या रागीट आणि आक्रमक स्वभावाची चर्चा परिसरात आधीपासून होती. काही दिवसांपूर्वी एका जिममध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर त्याने एका युवकाला कानफाडीत मारून चक्क उचलून जमिनीवर आपटल्याचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत संबंधित युवकाच्या मानेचे हाड मोडल्याची माहिती आहे. रानटी आणि क्षुल्लक कारणावरून हिंसक होणारा स्वभाव अशी त्याची ओळख बनली होती.
नुकताच कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता मोहळकर
काही दिवसांपूर्वी तो नाशिक कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वी खून, मारहाण, धमकी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
Nagpur Crime: कॉलेजमधले प्रेमसंबंध, सोनालीच्या लग्नानंतरही भेटायचा; नवऱ्यानं ट्रॅप लावला, होळीला गावी आलेल्या सागरची पती-पत्नीनं मिळून हत्या केली
5 पथके रवाना; आरोपींचा शोध सुरू
या थरारक घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच हल्लेखोरांना अटक केली जाईल.
शहरात दहशतीचे वातावरण
सात राऊंड फायरिंगमुळे जामखेडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा डोके वर काढत आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. जामखेड पुन्हा एकदा गँगवॉरच्या छायेत जात आहे का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
