धुळे, दि. २ : धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, सिंचन, उद्योग या त्रिसूत्रीनुसार प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकीय भवनाचे लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. यावेळी आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुपभय्या अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कुलगुरू डॉ. विलास खर्चे, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर कुलगुरू डॉ. नितीन पाटील,नगराध्यक्ष नयनकुवरताई रावल, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उद्योगपती सरकारसाहेब रावल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ध्वनिचित्रफित संदेश दाखविण्यात आला. त्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध प्रक्रिया संघावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य राहिले आहे. तापी नदीवर सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज निर्माणझाले. सुलवाडे बॅरेजमधून पाणी जामफळ धरणात टाकत आहोत. त्यामुळे आगामी काळात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील ५० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी कटिबध्द आहोत. शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी पणन विभागाने पुढाकार घेतला आहे. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती दीपस्तंभाप्रमाणे काम करेल. धुळे महानगरात ३५ कोटी रुपये खर्चून भव्य व्यापारी संकुल उभे राहत आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध प्रक्रिया उद्योगांची उभारणी केली जात आहे.

तापी नदीत बारमाही पाणी राहते. तेथे मत्स्य पालनासाठी प्रयत्न केले जातील. तसेच सरकारसाहेब रावल यांनी कृषी, उद्योग, शिक्षण या क्षेत्रांत सातत्याने काम केले. त्यांचे काम दीपस्तंभासारखे आहे, असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
आमदार श्री भदाणे, उद्योगपती श्री. रावल यांनी मनोगत व्यक्त केले. बाजार समितीचे सभापती श्री. पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, पालकमंत्री श्री. रावल यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
