• Sat. Sep 19th, 2026
Satara Crime : समुद्रातल्या तरंगणाऱ्या कोट्यवधींच्या सोन्याची तस्करी करणं महागात,  व्हेल माशाची उलटी जप्त, मुंबई-पुण्याच्या तस्करांना बेड्या

आंतरराष्ट्रीय बाजरपेठात कोट्यवधी रुपयांची किंमत असणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या सात तस्करांना महाबळेश्वर वन विभागाने अटक केली आहे. तसेच पाच किलो व्हेल माशाची उलटी या आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वर वन विभागाने वेण्णा लेक परिसरात व्हेल माशाची पाच किलो उलटी (अंबर ग्रीस) जप्त केली आहे. उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत कोटीच्या घरात आहे. याप्रकरणी मुंबई, ठाणे, पुणे आणि मालवण येथील सात तस्करांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईने महाबळेश्वरात मोठी खळबळ उडाली आहे. कारण व्हेल माशाची उलटीची तस्करी करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. व्हेल माशाच्या उलटीपासून सुगंधी अत्तर आणि औषधे बनवले जातात हे खरं आहे. तसेच व्हेल माशाच्या उलटीला समुद्रातलं तरंगणारं सोनं देखील म्हटलं जातं. पण यामुळे अनेकांकडून चुकीच्या पद्धतीने व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केले जाते. या गोष्टींचा विचार करुन कायदेशीरपणे कारवाई केली जाते. आतादेखील अशीच कारवाई साताऱ्याच्या महाबळेवर येथे करण्यात आली आहे.

व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी करणाऱ्या हितेंद्र मनोहर शेट्ये (रा. लालबाग-परळ, मुंबई), अतुल अशोक विश्वासराव, मोहन हरिभाऊ पाटील (रा. ठाणे), आकाश शामसुंदर धुरी (रा. मालवण, सिंधुदुर्ग), एक्झम क्लेमेंट फर्नांडिस, विल्सन झुजे फर्नांडिस (रा. मालवण, सिंधुदुर्ग) आणि कौस्तुभ मिलिंद प्रभू (रा. धनकवडी, पुणे) या सात जणांना मुद्देमालासह वन विभागाने पकडले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महाबळेश्वर परिसरात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती साताऱ्याच्या सहाय्यक वन संरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी वेण्णा लेक आणि मेटतळे परिसरात सापळा रचून तीन वाहनांची तपासणी केली. त्यातील एका वाहनामध्ये व्हेल माशाची उलटी आढळून आली. त्याचे वजन 5 किलो 300 ग्रॅम असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अंबर ग्रीस हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची एकमध्ये समाविष्ट असून त्याची विक्री, अवैध वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी 7 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास महाबळेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते करत आहेत. महाबळेश्वरचे वनपरिक्षेत अधिकारी महादेव मोहिते यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, सुनील लांडगे, वनपाल तुकाराम निकम, बाबू मराठे, देवेंद्र पवार, अविनाश गवळी यांनी ही कारवाई केली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा