खेळता खेळता बेडरूमचा दरवाजा लॉक झाला आणि एक वर्षाचा शिवांश आत अडकला. आई-वडिलांची धाकधूक वाढलेली असतानाच अग्निशमन दलाने ३५ फूट उंचीवर शिडी लावून खिडकीतून प्रवेश केला आणि….
दरवाजा लॉक झाल्याने बालक अडकला
केशवनगर येथील वृंदावन निवास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सतीश कांकरे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांना शिवांश नावाचा एक वर्षाचा मुलगा आहे. गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शिवांश हा घरातील एका बेडरूममध्ये खेळत होता, तर त्याची आई दुसऱ्या खोलीत होती. यावेळी वाऱ्याने किंवा अन्य कारणाने खोलीचा दरवाजा लॉक झाला आणि लहान बालक रूममध्ये एकटाच अडकला.
शेजाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ
दरवाजा लॉक झाल्याचे लक्षात येताच आईने आरडाओरडा केला. त्यानंतर बाळाच्या वडिलांना याची माहिती देण्यात आली. घरातील खोलीत बालक अडकल्याने आई-वडिलांची धाकधूक वाढत गेली. शेजाऱ्यांच्या मदतीने तब्बल एक तास दरवाजा उघडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र ते निष्फळ ठरले.
Pune News: महिला दिनानिमित्त PMPML कडून पुणेकरांना खास भेट; केवळ 500 रुपयांत घडणार ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन
अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन
अखेर अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी दासरे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाठीमागील खिडकी उघडी असल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने ३५ फूट उंच ॲल्युमिनियम एक्सटेन्शन लेडरच्या साहाय्याने खिडकीपर्यंत पोहोचले. त्यानंतर फायर हुकच्या मदतीने बंद झालेल्या दरवाजाची कडी काढण्यात आली. अवघ्या पंधरा मिनिटांत बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली.
Titwala Crime: ‘गाडी हळू चालवा’ म्हटल्याचा राग; टिटवाळ्यात टोळीचा घरावर हल्ला, कुटुंबाला बेदम मारहाण, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद
सुटकेचा निःश्वास
दरम्यान बालकाची सुखरूप सुटका झाल्याने बाळाच्या आई-वडिलांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. असं असलं तरी आता पालकांनी लहान बाळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. या रेस्क्यूनंतर नागरिकांनी अग्निशमन दलाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.
