Maharashtra BJP Rajya Sabha Candidate List: भाजपने महाराष्ट्रात पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करत दोन नवीन चेहऱ्यांना राज्यसभेसाठी संधी देण्याचा निर्णय घेत त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी काल जाहीर केली होती. त्यानंतर आज महाराष्ट्रातील चार उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी काल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं असून सत्ताधारी भाजपने काल राज्यसभा निवडणुकीसाठी एकूण नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली होती.
महाराष्ट्रातून अनेक नावे स्पर्धेत, ऐनवेळी धक्कातंत्र
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सातपैकी सहा जागांवर महायुतीकडून उमेदवार दिले जाण्याची शक्यता असून सातव्या जागेवर महाविकास आघाडीतील तीन पक्ष मिळून एक उमेदवार देणार आहेत. महायुतीतील सहापैकी चार जागांवर भाजप, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या चार जागांसाठी विनोद तावडे, रामदास आठवले यांच्यासह धैर्यशील पाटील, विजया रहाटकर यांच्यासह अनेक नाव चर्चेत होती. यातील तावडे आणि आठवले यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र इतर दोन जागांवर भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली. उमेदवारीसाठी कुठेही चर्चेत नसलेल्या माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावाची आज पक्षाकडून घोषा करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीत पेच
राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी कोणत्याही एका पक्षाकडे पक्षाकडे संख्याबळ नसल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र येऊन उमेदवार द्यावा लागणार आहे. मात्र तीनपैकी नक्की कोणत्या पक्षाने उमेदवार द्यायचा, यावरून महाविकास आघाडीत जोरदार खल सुरू असून अद्याप कोणताही पक्ष माघार घ्यायला तयार नसल्याने तिढा वाढला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंता पाटील यांनी काल मातोश्री इथं जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतरही राज्यसभेच्या जागेवर तोडगा काढण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे सातवा उमेदवार कोण असणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
