Ulwe Coastal Road: अटल सेतूला नवी मुंबई आणि विमानतळाशी थेट जोडणाऱ्या उलवे कोस्टल रोडचं काम वेगात सुरू आहे. सध्या या मार्गाला रेवस-करंजा पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
अटल सेतूवरून थेट जोडणी
अटल सेतू हा देशातील सर्वात लांब नदीपूल आहे. शिवडी आणि न्हाव शेवाला जोडणाऱ्या या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबईला थेट जोडणी मिळते. हा मार्ग सहा पदरी असून एकूण 21.8 किमी लांब आहे. यापैकी 16.5 किमी मार्ग नदीवरून जातो. शिवाय सिडकोने 6.7 किमी लांब उलवे सागरी किनारा मार्ग बांधण्याचं काम हाती घेतलं. हा मार्ग शिवाजी नगर इंटरचेंजवरून अटल सेतूला जोडतो. यामुळे प्रवासी उलवे सागरी किनारा मार्गाचा वापर करून दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईत पोहचू शकतात. या मार्गावरील मुख्य सागरी किनारा मार्ग 5.8 किमी लांब असून, पुढे 0.9 किमी लांब लिंक रोड तयार करण्यात येणार आहे. हा लिंक रोड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडेल.
Mumbai-Goa Highway: उर्वरित मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण, बाह्यवळण मार्ग, दोन पूल, रेल्वे उड्डाणपूल… कधी होणार काम?
रेवस-करंजा पुलालाही जोडणार?
उलवे सागरी किनारा मार्ग सहा पदरी असून मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा एक महत्त्वाचा सेतू ठरणार आहे. त्याशिवाय हा मार्ग द्रोनागिरीमधून रेवस-करंजा पुलालाही जोडणार आहे. यामुळे मुंबईकर आणि नवी मुंबईकरांना अलिबागला जाण्यासाठी एक पर्यायी मार्ग मिळणार आहे. अलिबागला जाण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार असून कोकणालाही थेट कनेकटीव्हिटी मिळणार आहे.
कसा आहे मार्ग?
उलवे सागरी किनारा मार्ग अमरा मार्गापासून सुरू होऊन पुढे बेलापूर, सीवूड्स, उलवे, बामणडोंगरी, तारघरवरून शेवटी शिवाजी नगर इंटरचेंजपर्यंत असणार आहे. इंटरचेंचपासून अटल सेतूला सुरूवात होईल. सध्या मुंबईवरून नवी मुंबईला येताना चिरले आणि वहाळमार्गे प्रवास करावा लागतो. परंतु, हा सागरी किनारा मार्ग सुरू होताच प्रवासात 25 मिनिटं वेळ वाचणार आहे.
Dahisar-Mira-Bhayander Metro: मेट्रो लाइन 9ची चाचणी फेरी यशस्वी, किरकोळ बदलांनंतर पहिला टप्पा होणार सुरू; दहिसर ते काशीगाव थेट जोडणी
मुख्य मार्ग आणि लिंक रोडसह सागरी किनारा मार्गावर एका रेल्वे उड्डाणपुलाचाही समावेश आहे. नेरूळ-उरण रेल लाइनवरून हा मार्ग उभारण्यात आला आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होताच नवी मुंबईतील पाम बीच मार्ग, नेरुळ, शीव-पनवेल महामार्ग आणि बेलापूरमधील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. दक्षिण मुंबईतून अटल सेतूवरून नवी मुंबईला जाण्यासाठी सध्या 120 मिनिटे वेळ लागतो. हाच वेळ सागरी किनारा मार्ग तयार होताच 30 ते 40 मिनिटांवर येणार आहे.
