• Fri. Mar 6th, 2026
    माणसं की जनावरं? नांदेडमधल्या रस्त्यांचे कैलाश खेरनी वाभाडे काढले, अशोक चव्हाणांसमोरच दैना मांडली

    Kailash Kher on Nanded Roads : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोरच रस्त्यांच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत गायक कैलाश खेर यांनी वाभाडे काढले.

    कैलाश खेर यांची कॉन्सर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नांदेड : बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून नेहमीच नाराजी व्यक्त केली जाते. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागतो. वाहतुकीची शिस्त नसल्याने वारंवार कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता या गंभीर समस्येचा फटका सुप्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांनाही बसला. नांदेडमध्ये आयोजित कुसुम महोत्सवासाठी आलेल्या गायक कैलाश खेर यांना या समस्येचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरच रस्त्यांच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत वाभाडे काढले.

    “रस्त्यावर माणसं चालत आहेत की जनावरे, हेच कळत नाही. खड्ड्यांमुळे धक्क्यावर धक्के बसले. वाहनात टांगल्या सारखं झालं” अशा शब्दांत कैलाश खेर यांनी आपला अनुभव सांगितला.

    कैलाश खेर यांनी काय सांगितलं?

    माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण आणि कै. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चव्हाण कुटुंबियांच्या वतीने नांदेडमध्ये दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही संगीत शंकर दरबार आणि कुसुम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

    रविवारी स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर तथा पद्मश्री कैलाश खेर यांचा कैलासा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम पार पडला. यावेळी कैलाश खेर यांनी गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनावरून आमदार श्रीजया चव्हाण यांचे कौतुक देखील केले.
    Maharashtra TimesSudhakar Shrotri : अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना पितृशोक, ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन

    खड्ड्यामुळे धक्क्यावर धक्के

    दरम्यान यावेळी त्यांनी नांदेडला येताचा अनुभव देखील सांगितला. हैद्राबादहून वाहनातून येत असताना काही अंतरापर्यंत चांगलं वाटलं, पण त्यानंतर बेशिस्त वाहतुकीचा सामना करावा लागला. वाहनचालक ईकडून तिकडे वाहन चालत होते. रस्त्यावर माणसांऐवजी जनावरांना मशीन दिल्यासारखं वाटत होतं, सारखं कार्यक्रम सुरु असल्याने झोप नव्हती, गाडीमध्ये झोपताना खड्ड्यामुळे धक्क्यावर धक्के बसत होते. बेल्ट लावून बसल्यानंतर वाहनात टांगल्यासारखं वाटलं, अश्या शब्दात गायक कैलाश खेर यांनी नांदेडच्या रस्ता आणि वाहतुकीवर नाराजी व्यक्त केली.

    Nitin Gadkari | मुंबई, बंगळुरु प्रवाशांसाठी खूशखबर, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

    विशेष म्हणजे कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महापौर कविता मुळे यांच्यासह आजी माजी आमदार उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कैलाश खेर यांनी वाभाडे काढले.
    Maharashtra TimesNashik News : आंतरजातीय लग्नामुळे बहिष्कृत, पाच वर्षांनी विवाहिता सन्मानाने माहेरी, जातपंचायत बरखास्त

    वाहतुकीवर तोडगा काढणार

    दरम्यान या समस्येबाबत काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापौर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. शंभर दिवसाच्या कामाच्या आरखडाबाबत माहिती घेत वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लवकरच या वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा