• Fri. Mar 6th, 2026

    Ahilyanagar Crime : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, नवनाथचा काटा काढण्याची धमकी अन् तरुणाचा जीव घेतल्याचा आरोप

    Ahilyanagar Crime : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, नवनाथचा काटा काढण्याची धमकी अन् तरुणाचा जीव घेतल्याचा आरोप

    अहिल्यानगरमध्ये एका तरुणाला अतिशय निर्घृणपणे संपवण्यात आलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृतक तरुणाच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्याने गंभीर आरोप केले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील रामवाडी येथे हनुमान मंदिरासमोर रविवारी (1 मार्च) रात्रीच्या सुमारास एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली आणि तपासाची चक्रे फिरवली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून, तरुणाची लोखंडी कत्ती, विटा आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

    या प्रकरणी समाधान माधव कानफाटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. समाधान कानफाटे यांनी भाऊ नवनाथ कानफाटे याच्या हत्या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ” आरोपी आपल्या भावावर त्याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत होते. आरोपी गेल्या चार-पाच दिवसांपासून तुझ्या भावाला समजून सांग, नाहीतर त्याचा काटा काढू, अशी धमकी देत होते”, असा आरोप माधव कानपाटे यांनी केला आहे.

    मृतकाच्या भावाचा गंभीर आरोप

    “आरोपींनी 1 मार्चला रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आरोपींनी कट रचून नवनाथला फोन करून हनुमान मंदिराजवळ बोलावून घेतले. तू आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस? असा जाब विचारत त्याच्याशी वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी पूर्वनियोजित कटानुसार संगनमत करून नवनाथवर हल्ला केला. यामध्ये आरोपींनी लोखंडी कत्ती, विटा आणि दगडांनी नवनाथच्या डोक्यावर आणि हातावर जबर प्रहार केले. या गंभीर हल्ल्यात नवनाथचा जागीच मृत्यू झाला”, असा आरोप नवनाथचा भाऊ माधव यांनी केला आहे.

    या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांकडून चार जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पुढील तपास करत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा