• Fri. Mar 6th, 2026

    Dubai Attack: आमच्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झालाय, आम्हाला लवकर घरी न्या; घाबरलेल्या मराठी पर्यटकांची सरकारला आर्त हाक

    Dubai Attack: आमच्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झालाय, आम्हाला लवकर घरी न्या; घाबरलेल्या मराठी पर्यटकांची सरकारला आर्त हाक

    वाशिम: इराण-अमेरिका युद्धामुळे जगभरातील पर्यटकांची अडचण झाली असून युद्ध सुरू असलेल्या आखाती देशांमध्ये अनेक पर्यटक अडकले आहेत. महाराष्ट्रातीलही काही पर्यटक विविध ठिकाणी अडकले असून वाशिमच्या रिसोडमधील चार पर्यटक दुबईत अडकले आहेत. “आमच्या हॉटेलच्या शेजारी मेट्रो स्टेशनवर स्फ़ोट झाला, त्यामुळं आमची चिंता वाढली आहे, आम्हाला लवकर मायदेशी घेऊन जा,” अशी आर्त हाक या पर्यटकांनी सरकारला दिली आहे.

    रिसोड येथील भगवान निर्बान, त्यांची पत्नी पदमाबाई निर्बान, मुलगा पवन निर्बान आणि सून नंदा निर्बान हे २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथून दुबईला पर्यटनासाठी गेले होते. पाच दिवसांचा दौरा पूर्ण करून २८ फेब्रुवारी रोजी अबू धाबी येथून पुण्याकडे परतण्याचे त्यांचे तिकीट आरक्षित होते. मात्र अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे विमानतळावरील उड्डाण सेवा स्थगित करण्यात आली आणि त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे.

    रिसोड येथील निर्बान कुटुंबिय; वृद्ध आई वडील, भाऊ वाहिनी दुबईत अडकल्यामुळं चिंतेत असून लवकरात लवकर भारतात आणण्याची विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

    आखाती देशात मराठवाड्यातीलही ३४ प्रवासी अडकले

    मध्यपूर्वेत इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेत युद्ध भडकले आहे. या युद्धाने आखाती देशातील जवळपास सहा ते सात देश युद्धाच्या सावटाखाली आले आहेत. या युद्धामुळे आखाती देशात गेलेले भारतातील अनेक पर्यटक, प्रवासी अडकले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर येथील तिघांसह मराठवाड्यातील ३४ जणांचा समावेश आहेत. सर्व भारतीय नागरिक सुखरूप असून त्यांच्या परतण्याबाबत प्रशासनाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

    मध्यपूर्वेतील इराण आणि इस्त्रायल या देशात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाने आखाती देशातील युएई, कतार, बहरीन यासह इतर देशांच्या हवाई सीमा बंद करण्यात आल्या आहेत. हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारतातून या देशांमध्ये गेलेले प्रवासी अडकून पडले आहेत. विशेषतः दुबईत अडकलेल्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. मराठवाड्यातील ३४ प्रवासी मध्य पुर्वेतील देशात अडकले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

    दरम्यान, मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed