भांडुपमध्ये ८ वीतील विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दादागिरीच्या वादातून मित्रांनी सिद्धार्थ लोंढेची हत्या करून मृतदेह विहार तलावात फेकला.
विहार तलावात आढळला मृतदेह
दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी विहार तलावात एका मुलाचा मृतदेह आढळून आला. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. सुरुवातीला बुडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र शवविच्छेदन अहवालात फुफ्फुस आणि पोटात पाणी नसल्याचे, तसेच डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत व अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे नमूद झाल्याने हत्येचा संशय बळावला.
दादागिरीच्या वादातून मारहाण
तपासादरम्यान सिद्धार्थला शेवटचे त्याच परिसरातील तीन मित्रांसोबत पाहिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला ‘पोहायला गेलो असताना तो बुडाला’ असे सांगण्यात आले. मात्र स्वतंत्र चौकशीत तिघांनीही मारहाण करून त्याला तलावात फेकल्याची कबुली दिली. दादागिरीच्या वादातून रागाच्या भरात काठीने मारहाण केल्याचे समोर आले आहे.
तिन्ही अल्पवयीन मुलं बाल निरीक्षण गृहात
या प्रकरणी १४ ते १५ वयोगटातील तिन्ही मुलांना ताब्यात घेऊन डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे भांडुप परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.
