• Sun. Mar 8th, 2026
    Nagpur Crime : ‘जामीन लवकर मिळत असल्याने घरफोड्या करतो’, नागपुरात चोरट्याचा अजब जबाब

    नागपुरात पोलिसांनी एका कुख्यात चोरट्याला अटक केली आहे. या चोराने पोलिसांना धक्कादायक जबाब दिला आहे. जामीन लवकर मिळत असल्याने आपण घरफोड्या करतो, असा जबाब आरोपीने दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : पोलिसांनी नागपुरात एका कुख्यात कुरफोडी करणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अतिशय शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्याने आपण घरफोडी का करतो? याचं अजब उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे आपण मध्य प्रदेश पेक्षा नागपूर आणि महाराष्ट्रात का जास्त घरफोडी करतो? याबाबत दिलेलं उत्तर ऐकून पोलीसही चक्रावली आहेत. आपल्याला नागपूर आणि महाराष्ट्रात घरफोडी केल्याने लवकर जामीन मिळत असल्याने घरफोडी करतो, असा जबाब या आरोपीने दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आरोपीला पोलिसांचा भय राहिलेला नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पण तरीही त्याचा जबाब हा विचार करायला लावणारा आहे. विशेष म्हणजे या चोराच्या नावावर तब्बल 60 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पोलीस आणि न्याय व्यवस्था या चोरट्याला जन्माची अद्दल घडवणार का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    नागपूर, महाराष्ट्रात लवकर जामीन मिळत असल्याने येथे वारंवार घरफोड्या करतो. महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यप्रदेशात लवकर जामीन मिळत नाही. त्यामुळे तेथे घरफोड्या कमी करतो, असा धक्कादायक जबाब कुख्यात घरफोड्या संदीप खेमचंद टेंभरे (वय २७) याने पोलिसांना दिले. त्याच्या या जबाबाने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    १० फेब्रुवारीला गिट्टीखदानमधील बाळाभाऊपेठ येथील अमोल वसंत परतेकी (वय ३२) यांच्याकडे घरफोडी झाली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त राहुल माकणीकर, साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी विरोधी पथकाचे निरीक्षक दिलीप चंदन, साहाय्यक निरीक्षक नितीन चुलपार, प्रवीण मुन, विवेक झिंगरे, स्वप्निल पाटील, राहुल रोटे, नितीन तिवारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घरफोड्यांचा समांतर तपास सुरू केला.

    संदीप याने ही घरफोडी केली असून तो आणखी घरफोड्या करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती निरीक्षक दिलीप चंदन यांना मिळाली. चंदन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून मानकापूर रिंगरोड परिसरात संदीप याला अटक केली. त्याच्याकडून घरफोडीच्या सहा घटना उघडकीस आणल्या.

    पोलिसांनी आरोपी संदीप याच्याकडून 14 लाख रुपये किमतीची सोन्याची लगड, कार, मोटारसायकलसह 20 लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. संदीप याच्याविरुद्ध महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात 60 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रात लवकर जामीन मिळत असल्याने येथे घरफोड्या करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा