Accident News: अपघाताच्या कालावधीत वाहनचालकांकडून घेण्यात आलेला टोल परत केला जाणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर काही दिवसांपूर्वी प्रोपेलिन या ज्वलनशील वायूचा टँकर उलटल्याने जवळपास ३२ तास महामार्ग ठप्प होता. याबाबत आमदार चेतन तुपे, अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील माहिती दिली. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हॅजमॅट व्हेईकल (धोकादायक पदार्थांची वाहतूक करणारे वाहन) युनिट तसेच बोगद्यात आग लागल्यास अग्निशमन युनिट उभारण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी अशा परिस्थितीत पोलिस किंवा संबंधित यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करणे तसेच प्रवाशांना थेट माहिती पोहोचविण्याची मागणी केली.
दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या अपघातानंतर संबंधित टँकरला एअरलिफट करता येऊ शकते का, याची चाचणी एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
“अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडे अशा स्थितीत मदत करण्याची यंत्रे नव्हती आणि एसओपीही नाही. त्यामुळे तशी एसओपी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच अशा परिस्थितीत आपण हेलिकॉप्टर वापरतो पण सूर्यास्तानंतर आपल्याकडे हेलिकॉप्टर वापरता येत नाहीत त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा आहेत. ‘आयटीएमएस’चा प्रभावी वापर करण्यात येईल, त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला व्यक्तिगतरित्या थेट माहिती मिळत राहील, असे प्रयत्न करू,” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
