• Tue. Mar 10th, 2026

    मराठी भाषेत शिकूनच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो -निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 1, 2026
    मराठी भाषेत शिकूनच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो -निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई – महासंवाद

    कविवर्य कुसुमाग्रज नगरी, नाशिक दि. १ (जिमाका): आपली मातृभाषा असलेल्या मराठी भाषेत शिक्षण घेऊनच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो, असे गौरवोद्गार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले.

    कविवर्य कुसुमाग्रज नगरीत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप आज सायंकाळी झाला. त्यावेळी निवृत्त सरन्यायाधीश गवई बोलत होते.

    यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मराठी भाषा विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संगीतकार अजय आणि अतुल गोगावले, उपमहापौर विलास शिंदे, तारपा वादक पद्मश्री भिकल्या धिंडा आदी उपस्थित होते.

    न्या. गवई म्हणाले, कला, साहित्य जोपासण्यासाठी राजाश्रय आवश्यक आहे.  राज्यातील कला, संस्कृती संतांनी जोपासली. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही कलाकरांचा सन्मान केला. राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात कलाकरांना राजाश्रय मिळाला होता. मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी अशा प्रकारची संमेलन महत्वपूर्ण भूमिका निभावतात, असे सांगून त्यांनी पुरस्कार प्राप्त कलाकारांचे कौतुक केले. नाशिकसारख्या ऐतिहासिक नगरीत हे संमेलन होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

    मराठीच्या विश्व गौरवासाठी शासन कटिबद्ध –  सभापती प्रा. राम शिंदे

    विधानपरिषदेचे सभापती प्रा. शिंदे म्हणाले, भाषा ही समाजाला जोडण्याचे काम करते, त्यास मराठी भाषा अपवाद नाही. मराठी भाषेचा विश्व गौरव व्हावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर मराठी भाषा विद्यापीठाच्या जिल्हास्तरावर शाखा सुरू कराव्यात. याबरोबरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    मराठी भाषेचा गौरव करणे प्रत्येकाचे कर्तव्य – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

    विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, मराठी भाषेचे संवर्धन आणि गौरव करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने संकल्प करावा. लोकशाही बळकट करण्यासाठी मराठी भाषा महत्वाची भूमिका बजावत असून त्यासाठी मराठी भाषेचा प्रसार होणे आवश्यक आहे.

    यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरचित्रित संदेश दाखविण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी ही रोजगार आणि अर्थार्जनाची भाषा बनविण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहेत.

    युवा वर्गासाठी मराठी भाषेचा सेवेकरी पुरस्कार –  मंत्री डॉ. उदय सामंत

    मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांनी संवाद साधताना सांगितले की, नाशिकवासियांनी विश्व मराठी संमेलन यशस्वी करून दाखविले आहे. विश्व मराठी संमेलन हे फक्त मराठी भाषेसाठी मर्यादित नाही, तर मराठीचे सर्वांग दर्शन आहे. पुढील वर्षीचे संमेलन नागपूर येथे होईल. प्रदर्शनातील स्टॉल वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. स्थानिक कलाकारांनाही या संमेलनात स्थान दिले आहेत. दरवर्षी युवा वर्गाला मराठी भाषेचा सेवेकरी हा पुरस्कार देण्यात येईल. पुढील दोन महिन्यात लंडनला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जगातील पहिले वैश्विक भाषा केंद्र सुरू करण्यात येईल. पाच लाख रुपयांचा मराठी भाषा सेवेकरी पुरस्कार भाषेचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्तीना देण्यात येईल.

    सर्व भाषिक शाळांसाठी मराठी भाषा अनिवार्य – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

    मंत्री भुसे म्हणाले, मराठी भाषा हा विषय शासनाने सर्व भाषिक शाळांसाठी अनिवार्य केला आहे. त्याची अंमलबजावणी शिक्षण विभाग करीत आहेत.

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशपातळीवरील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात शिकविला गेला पाहिजे यासाठी केंद्र सरकारनेही मंजुरी दिली आहे. मराठी भाषेसाठी शासन नेहमीच आग्रही आहे. येत्या वर्षभरात शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून मराठी शाळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात येतील.

    संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी प्रास्ताविक केले.

    विविध पुरस्कारांचे वितरण

    तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना निवृत्त सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी केलेल्या तारपा वादनास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट करत दाद दिली. संगीतकार अजय अतुल यांना कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संचालक डॉ. शामकांत देवरे यांनी आभार मानले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed