Panvel-Karjat Railway Corridor: आता सीएसएमटीहून कर्जतला जाण्यासाठी नागरिकांना आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचं काम किती पूर्ण झालं ते जाणून घ्या
नवा पाचवा मार्ग
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) एमयूटीपी तीन अंतर्गत नवीन पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मध्य रेल्वेवरील हा पाचवा मार्ग ठरणार आहे. सद्य:स्थितीत मध्य रेल्वेवर मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पोर्ट (उरण) मार्गावर लोकल धावतात.
Dombivli-Thane Bus: लोकलची गर्दी कमी करण्यासाठी डोंबिवली-ठाणे बस, 4 मार्चपासून सेवा सुरू; पण डोंबिवलीकरांना खरंच होईल का फायदा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपनगरी रेल्वेचा विस्तार चारशे किमीपार करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर एमआरव्हीसीने प्रवासी गरज लक्षात घेत नव्या रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी नियोजन सुरू केले होते. सद्य:स्थितीत मध्य रेल्वेवर एकूण २५४ किमी आणि पश्चिम रेल्वेवर १२४ किमी मार्गावर उपनगरी रेल्वे धावतात. नव्या पनवेल-कर्जत लोकलमुळे मुंबई उपनगरी रेल्वेचा विस्तार ४०८ किमीपर्यंत होणार आहे.
काम 85 टक्के पूर्ण
नव्या पनवेल-कर्जत लोकल मार्गाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कामे पूर्ण झाल्यावर लोकल धावण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा चाचणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नव्या रेल्वे मार्गात पनवेल, चिखले, पोयंजे (मोहापे), चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके आहेत. नव्या लोकलमुळे नवी मुंबईसह कर्जत येथील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
Mumbai-Ahmedabad Bullet Train: राज्यात बुलेट ट्रेनची 4 स्थानकं, पहिल्या टप्प्यात ठाणे, विरारचा विकास; कधी-कसं होणार काम?
पनवेल आणि कर्जत स्थानकात रेल्वे वाहतूक अबाधित ठेवून यार्डमध्ये बदल करण्याचे आव्हानात्मक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. सध्याच्या वापरात असलेल्या यार्डमध्ये बदल करून त्यात नव्या रेल्वे मार्गिकेसाठी पॉइंटसह अन्य तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेवरील सर्वाधिक लांबीच्या वावरले बोगद्यासह नढळ आणि किरावली असे तीन बोगद्यांतून लोकल प्रवास घडणार आहे. बोगद्यांमध्येच पहिल्यांदाच खडीमुक्त रुळांचा वापर करण्यात आला आहे. रुळांना मजबुती देण्यासाठी कॉंक्रिटचा वापर करण्यात आला आहे, असे एमआरव्हीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.
