• Fri. Mar 6th, 2026
    राज्यसभेच्या सातही जागांवर उमेदवार उतरवा, अमित शाहांच्या थेट सूचना, अतिरिक्त 20 मतांसाठी महायुतीची जुळवाजुळव

    Maharashtra Politics : पहिल्या टप्प्यात सहा जागांवर विजयाची खात्री असलेली सत्ताधारी महायुती ऐन वेळी सातव्या जागेसाठीही उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत, सर्वाधिक तीन ते चार जागा जिंकण्याइतके आमदार संख्याबळ असलेल्या भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या व्यतिरिक्त आश्चर्याचा धक्का देणारी नावे जाहीर होऊ शकतात. यात एका अमराठी नेत्याच्या नावाचीही चर्चा आहे. विरोधकांच्या महाविकास आघाडीत उमेदवारीवरून झालेले वाद पाहता, पहिल्या टप्प्यात सहा जागांवर विजयाची खात्री असलेली सत्ताधारी महायुती ऐन वेळी सातव्या जागेसाठीही उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.

    नावांच्या निश्चितीसाठी बैठक

    राज्यसभेसाठी भाजपकडून चार उमेदवारांची नावे ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी राज्य सुकाणू समितीची नुकतीच बैठक झाली. त्यात निश्चित झालेल्या नावांबाबत भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राज्यातील नेते चर्चा करण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसांत भाजपचे राज्यातील उमेदवार जाहीर होऊ शकतात.

    अपवाद ठरणार का?

    परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आठवले या वरिष्ठ मंत्र्यांचे अपवाद वगळता भाजप राज्यसभेसाठी एका नेत्याला दुसऱ्यांदा संधी देत नाही. किंबहुना महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशासारख्या राज्यांबाबत पक्षाने धोरण म्हणूनच तसे ठरविल्याचे पूर्वीची उदाहरणे सांगतात. माजी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड याला अपवाद ठरणार का, असा प्रश्न यावेळी आहे. कराड, रावसाहेब दानवे व धैर्यशील पाटील यांना राज्यात काम करण्यास सांगितले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

    तावडे-रहाटकरांच्या नावाची चर्चा

    भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचीही नावे चर्चेत आहेत. तावडे स्वतः महाराष्ट्रातून राज्यसभेवर येण्यास कितपत उत्सुक आहेत, हाही प्रश्न कायम आहे. भाजप उमेदवारांची नावे वरिष्ठ पातळीवर निश्चित झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. यात एका अमराठी नेत्याचेही नाव असल्याची चर्चा आहे.

    Parth Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर घातपाताचा संशय, पण पार्थ पवार बोलत का नाही ?

    शाहांची सूचना

    राज्यसभेच्या सात जागांपैकी भाजप चार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एक व शिवसेना एक असे सूत्र महायुतीत निश्चित झाले आहे. सातव्या जागेसाठी मविआमधील वाद कायम असताना, या जागेवरही उमेदवार उतरविण्याची सूचना थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून आल्याचे समजते. भाजपला सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल, तर २० मते अतिरिक्त आणावी लागतील व ते साध्य करण्याची तयारी महायुतीने केल्याचे समजते.
    Maharashtra TimesAjit Pawar : अजितदादांचं विमान जमिनीवर आदळताच पायलटचे शेवटचे शब्द काय? AAIB च्या 22 पानी अहवालात माहिती समोर

    मविआतील दुफळी

    महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल, तर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देण्याचा पर्याय प्रत्यक्षात येण्याची चिन्हे नसल्याचे भाजप सूत्रांना वाटते. काँग्रेस आणि उबाठा शिवसेना पक्ष हे दोन पक्ष एकत्र आले, तरी त्यांच्याकडे काठावरच्या बहुमतासाठीची ३६ मते होतात.
    Maharashtra TimesJagdeep Dhankhar : उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा आजारपणामुळे दिलाच नव्हता, रातोरात पायउतार झालेल्या धनखडांनी स्वतःचाच दावा खोडला
    राज्यसभेची निवडणूक काही दिवसांवर आल्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजप या निवडणुका अत्यंत चुरशीने लढवत असल्याने त्या रंगतदार होतात.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा