ठाकरे बंधू एकत्र येण्याचं क्रेडिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेताना दिसतात. पण यावरुन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी विंदा करंदीकरांच्या कवितेच्या ओळींचा दाखला देत फडणवीस यांना खोचक टोला लगावला.
महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषेच्या शिक्षणाची सक्ती करण्यात येणार होती. पण या त्रिभाषिक धोरणाला मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. याच मुद्द्यावरुन दोन्ही भाऊ एकत्र आले आणि त्यानंतर दोन्ही भावांची राजकीय युतीदेखील पुढे झाली. दोन्ही बंधू एकत्र येण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचं ठाकरे बंधू याआधी म्हणाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते मान्य करण्यात आलं आणि त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही नुकतंच आपल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खोचक टोला लगावला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.
“मराठी दिन म्हणायचं म्हणजे हा एकच दिवस असतो, पण आपण सर्वजण मराठी बोलणारे मराठी आईचे मुलं आहोत. त्यामुळे आपल्यासाठी रोजच मराठी भाषा दिवस असलाच पाहिजे किंवा मराठी भाषा असलीच पाहिजे. एक अप्रतिम कार्यक्रम आपण अनुभवला, जादूची पेटी. आपल्या आयुष्यात मतपेटी आहे. राजकारण्यांच्या थापा आपण रोजच बघतोय, पण ढोलकीवरची थाप विरळ होत चाललीय”, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार
“आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाहीत. पण आमच्यावर जबरदस्ती करु नका एवढीच आमची जोपर्यंत ऐकताय तोपर्यंत नम्र विनंती आहे. दीपकजी तुम्ही बोलता-बोलता म्हणालात की, माझा राग आला तरी चालेल. पण हल्ली मला पवारांचा राग नाही येत. पण तुम्ही मराठीसाठी बोलत आहात. शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून झालेला आहे. त्यामुळे मराठीसाठी आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्याचं क्रेडिट घेत आहेत की, दोन बंधूंना आम्ही एकत्र आणलं. विंदा करंदीकरांची एक कविता आहे. त्यातील दोन कडवे आहेत. लढवून बांधवांना संहार साधणारा गीता खुशाल सांगे, त्याला इलाज नाही. आधी भांडवायचं, भांडणं लावायची आणि नंतर आम्हीच सगळं केलं. भावा-भावात भांडणं लावायची, संहार घडवायचा, मग गीता सांगायची, त्याचा उपयोग काय? त्याला इलाज तरी काय?”, अशा शब्दांत ठाकरेंनी टोला लगावला.
“जसं आम्हाला दोघे भावांना एकत्र आणलं तसं तिकडे तुम्ही काही एकत्रिकरण करता आहात का? ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत, विलीन होणार म्हणून, तसं काही करत आहात का? लोकं वाट बघत आहेत. नाहीतर कशाला या फुकटच्या गोष्टी करताय. कशाला नसत्या गोष्टीचं श्रेय घेताय”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
