कल्याणात भटक्या कुत्र्यांची दहशत जीवघेणी ठरत आहे. मोहने-गाळेगाव परिसरात ७ वर्षांच्या खुशील वाघे या चिमुरड्याचा कुत्रा चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून…
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, खुशीलला भटका कुत्रा चावला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी खुशीलला कुत्र्याने चावा घेतला, त्याच वेळी एका दुसऱ्या मुलावरही कुत्र्याने हल्ला केला होता. हा मुलगा जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना (ठाकरे गट) नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात जाऊन आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.
भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला
बल्याणी चौक, उंभार्णी, मोहिली, गाळेगाव, जेतवननगर, तिपन्नानगर, आर. एस. टेकडी आणि मोहने परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे कुत्रे रस्त्यावरून येण्या-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात. भटक्या कुत्र्यांच्या या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होत असून, पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
Buldhana Crime : जुना वाद विकोपाला गेला, पाच जणांनी अनिकेतला शेतात गाठलं, निर्घृणपणे संपवलं; पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
नगरसेविकेची मागणी
भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक आणि गाडी तैनात करण्यात यावी, तसेच त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात यावे, अशा मागण्या नगरसेविका गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत.
