• Fri. Mar 6th, 2026

    Uddhav Thackeray : ‘आम्ही हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला पण अंमलबजावणी केली नाही’, उद्धव ठाकरेंचा खुलासा

    Uddhav Thackeray : ‘आम्ही हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला पण अंमलबजावणी केली नाही’, उद्धव ठाकरेंचा खुलासा

    उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला होता. पण आम्ही अंमलबजावणी केली नव्हती, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी शिक्षणाच्या सक्तीच्या निर्णयाला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी प्रचंड विरोध केला. या दोन्ही पक्षांसह महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांनीदेखील या निर्णयाला विरोध केला होता. सरकारच्या त्रिभाषिक धोरणाविरोधात विरोधी पक्ष एकटला होता. त्यामुळे महायुती सरकारला या प्रकरणात बॅकफूटला जावं लागलं होतं. इयत्ता पहिलीपासून शाळेत हिंदी भाषेची सक्ती करावी का? याबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. पण या मुद्द्यावर पुन्हा राजकारण तापताना दिसत आहे. कारण हिंदी सक्तीचा अहवाल ठाकरे सरकारने स्वीकारला होता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणाले. त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या सरकारने अहवाल स्वीकारल्याचं उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. पण अंमलबजावणी करावी की नाही यासाठी कमिटी नेमली होती. त्या कमिटीची बैठकच कधी झाली नव्हती, असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं.

    “मला एका गोष्टीचं समाधान आहे, म्हटलं तर अभिमान सुद्धा आहे की, मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली. त्याचबरोबर वैषम्य देखील वाटतं की, महाराष्ट्रात मराठी सक्तीचा निर्णय घ्यावा लागतो. याचा मला खेद सुद्धा आहे. सक्ती कशाला पाहिजे? महाराष्ट्र म्हटल्यावर मराठीच पाहिजे. पण ते मी केलं. त्यानंतर काल पुन्हा… ह्यांची सवय काय तर जुनं दळण दळत बसायचं. एवढं दळायचं की, लोकं शेवटी ते खरं मानायला लागतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    ‘कमिटीच्या बैठकीआधीच सरकार पाडलं’

    “हिंदीची सक्तीसाठी कमिटी नेमली होती. तो अहवाल कमिटीने दिला. तो अहवाल सरकारने घेतला. आता तो अहवाल स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी करायची की नाही? त्या अनुषंगाने कमिटी नेमली होती. त्या कमिटीची बैठकच झाली नाही. कारण त्याआधी तुम्ही सुरत-गुवाहाटी अशी यात्रा काढली. त्याच्यात सरकार पाडलं. त्यामुळे कमिटीची बैठक झाली नाही. तो निर्णय आम्ही घेतला म्हणून तुम्ही लादणार होता तर असे आम्ही अनेक निर्णय घेतले ते तुम्ही का रद्द केले?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

    “मराठी भाषा भवन अजूनही उभे राहत नाही. महाराष्ट्र आणि बंगाल यांना रंगभूमीची पार्श्वभूमी आहे. या इकडे चौपाटीला मी मराठी रंगभूमीची वाटचाल सांगणारं दालन उभं करणार होतो. पण तो निर्णय रद्द केला आणि बिल्डरच्या घशात घातलं. तुम्ही तो निर्णय का अंमलात आणला नाही? मराठी भाषा भवन अजून पडून राहिलेलं आहे. भाजपचं ऑफिस उभं राहतंय ते सुद्धा असंच भुखंड ढापून. म्हणजे तुमच्या पक्षाची कार्यालये उभे करत आहात आणि माझ्या मातृभाषेचं भवन बांधायला तुम्हाला मुहूर्त शोधावा लागतोय? कसले तुम्ही मुख्यमंत्री? कोणत्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री?”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा