• Fri. Mar 6th, 2026

    Ramdas Athawale : मुख्यमंत्र्यांशी बोलू, मागणी मान्य न झाल्यास प्रभाग रचनेला कोर्टात आव्हान देऊ, रामदास आठवले यांचं वक्तव्य

    Ramdas Athawale : मुख्यमंत्र्यांशी बोलू, मागणी मान्य न झाल्यास प्रभाग रचनेला कोर्टात आव्हान देऊ, रामदास आठवले यांचं वक्तव्य

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी केली. तसेच आपली मागणी मान्य झाली नाही तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कमी-अधिक उमेदवार निवडून येत असत. पण, प्रभाग रचनेमुळे एकही उमेदवार निवडून आला नाही. चार उमेदवारांचा एक प्रभाग होऊन एकगठ्ठा मतदानामुळे लहान पक्षांवर अन्याय होतो. त्यामुळे प्रभाग रचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. अन्यथा, प्रभाग रचनेविरोधात ‘रिपाइं’ न्यायालयात दाद मागेन, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपने दिलेल्या आश्वासनानुसार ‘रिपाइं’ला स्वीकृत नगरसेवकपद तरी द्यावे, असे आठवले म्हणाले.

    दोन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर शहरात जागतिक बौध्द धम्म परिषदेला उपस्थित राहिले. त्यापूर्वी सुभेदारी विश्रामगृह येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात कर्मचाऱ्यांनी चोरीचा आळ घेऊन केलेल्या मारहाणीनंतर विद्यार्थिनीने गळफास घेतला. तिला दलित म्हणून मारहाण केल्याचा आरोप आहे. तिने आत्महत्या केली नसून फाशी दिल्याचे तिच्या आईने सांगितले. औसा तालुक्यातील एका गावात तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. तसेच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सत्यस्थिती जाणून घेतली. या प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे”, असे आठवले यांनी सांगितले.

    बिहार राज्यातील गया येथील महाविहार ट्रस्टवर १९४९ च्या कायद्यानुसार चार बौद्ध, चार हिंदू आणि अध्यक्षपदी जिल्हाधिकारी असतात. मात्र, ट्रस्टवर सर्व बौद्ध असावेत, अशी आमची मागणी आहे. याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे, असे आठवले यांनी सांगितले.

    उत्तम प्रशासक असलेल्या अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली असून त्यानुसार चौकशीचा निर्णय होईल. आमदार रोहीत पवार, अमोल मिटकरी यांनी विमान कंपनीवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात घातपात असावा का? याची चौकशी करावी. मात्र, राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे पवार यांची हत्या झाली असे वाटत नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

    येत्या तीन एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपणार आहे. पण, तिसऱ्यांदा आपली राज्यसभेवर निवड होईल याची खात्री आहे. आणखी सहा वर्ष मिळाल्यास जोमाने काम करू, असे आठवले यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, बाळकृष्ण इंगळे, किशोर थोरात आदी उपस्थित होते.

    ‘एसआयआर’ योग्यच

    देशातील पाच राज्यात लवकरच निवडणुका आहेत. त्यापूर्वी ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मतदारयादी पारदर्शक ठेवण्यासाठी त्याची गरज होती. ‘एसआयआर’ला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्याशी सहमत नाही. इतर राज्यात ‘रिपाइं’ला संधी आहे, मात्र महाराष्ट्रात मित्रपक्ष संधी देत नाही, असा खेद आठवले यांनी व्यक्त केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा