Hind Di Chadar: सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका, शासकीय वाहने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व बसेस, इतर अत्यावश्यक सेवेतील तसेच सदर कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना लागू होणार नाही.
नवी मुंबई परिसरात २८ ते एक मार्चला हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित रहातात. या कालावधीत नवी मुंबई परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासह नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्व रस्ते व मार्गावरून सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांच्या वाहतुकीस २८ फेब्रुवारी व एक मार्चला सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, या कालावधीत वाहन चालक व मालकांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोर घाटातून खालापूर टोलनाका, चौक फाटा परिसरात सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना बंदी आहे.
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व वाहन चालक व मालकांनी आपली वाहने या कालावधीत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गासह जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटातून प्रवेश करू नये. सदरची वाहने ही यापूर्वीच्या येणा-या ट्रक टर्मिनल पार्कींगच्या ठिकाणी मार्गालगत उभी करावी अन्यथा आपली गैरसोय होऊ नये यासाठी तसे प्रवास व वाहतुकीचे नियोजन करावे.
वाहतूक नियमनासाठी वाहतूक विभागाकडून योग्य तो अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार असून, गैरसोय टाळण्याकरीता वाहतूक पोलीस विभागास सहकार्य करावे ही विनंती, असे आवाहन पोलीस उपायुक्त, वाहतूक नवी मुंबई व महामार्ग पोलिस प्रशासनाने केलं आहे.
