• Thu. Jun 18th, 2026

    वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश; अन्न, नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई, १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 17, 2026
    वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश; अन्न, नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई, १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त – महासंवाद

    मुंबई, दि. १७ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    अन्न, नागरी पुरवठा विभागाचे नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १६ जून २०२६ रोजी दक्षता पथकाने वडाळा परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन इंधन टँकरचे सील तोडून त्यातील इंधन प्लास्टिक कॅनमध्ये भरून चोरी केली जात असल्याचे आढळून आले.

    दक्षता पथकाने घटनास्थळी एका व्यक्तीस रंगेहाथ पकडले. तपासात २० लीटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये प्लास्टिक पाईप व व्हॉल्वच्या साहाय्याने इंधन काढले जात असल्याचे उघड झाले. पथकाने तपासणी केलेल्या एमएच-०४ केयू-१८२६ या टँकरमध्ये १० हजार लीटर पेट्रोल आणि १४ हजार लीटर डिझेल, तर एमएच-०४ एलवाय-६३८८ या टँकरमध्ये २९ हजार लीटर विमान इंधन (एटीएफ) असल्याचे आढळून आले.

    कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल व (एटीएफ) इंधनासह संबंधित टँकर आणि अन्य साहित्य असा एकूण १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, उपनियंत्रक माधुरी शिंदे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप अधिकारी गणेश पवार, सहायक शिधावाटप अधिकारी योगेश्वर मोरे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, राहुल इंगळे आणि अरुण काते यांनी केली.

    प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed