केंद्रीय मंत्री रामदास आठवले, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. भाजप च्या संख्याबळाचा विचार करता त्यांचे ३ उमेदवार विजयी होऊ शकतात. मिक्षपक्षांच्या मदतीनं भाजपचा चौथा उमेदवार विजयी होऊ शकतो. या ४ जागांसाठी भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीनं २५ नावांची यादी तयारी केली आहे. या नावांमधून भाजप नेतृत्त्व कोणाची निवड करणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या यादीत अनेक माजी मंत्री, माजी आमदार, खासदार यांची नावं आहेत.
भाजपच्या यादीत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे , माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माजी आमदार कुणाल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार प्रीतम मुंडे, माधव भांडारी यांची नावं आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर आहेत. त्यांचा कार्यकाळदेखील एप्रिलमध्ये संपणार आहे. भाजपच्या वाट्याला आलेल्या चारपैकी एका जागेवर आठवले यांना संधी मिळेल, अशी शक्यता आहे. पण मित्रपक्षाच्या नेत्याच्या नावाची शिफारस करणं हा विषय प्रदेश कोअर कमिटीच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे याबद्दलचा निर्णय भाजपचं केंद्रीय नेतृत्व घेईल.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, आशिष शेलार, अमित साटम उपस्थित होते.