• Fri. Sep 11th, 2026

आयुष क्रांतीचे दर्शन: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनुभवली शेगावमधील भव्य आरोग्य प्रदर्शनी – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 25, 2026
आयुष क्रांतीचे दर्शन: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनुभवली शेगावमधील भव्य आरोग्य प्रदर्शनी – महासंवाद

बुलढाणा, दि,२५  (जिमाका) : भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते आज श्रीक्षेत्र शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आर्युवेद महासंमेलनाच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’ चा अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांनी मेळाव्यातील भव्य आरोग्य प्रदर्शनीच्या विविध स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली. पारंपरिक भारतीय चिकित्सा पद्धती आणि आधुनिक आरोग्य सुविधांचा संगम असलेल्या या प्रदर्शनाने राष्ट्रपतींचे विशेष लक्ष वेधून घेतले.

या पाहणी दरम्यान त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष,आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर हे उपस्थित होते.

राष्ट्रपती महोदयांनी प्रदर्शनीमधील विविध पॅथींच्या स्टॉल्सना भेट देऊन तिथे उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पती, उपचार पद्धती आणि रुग्ण तपासणी केंद्रांची सविस्तर माहिती घेतली. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आयुष मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.

हा चार दिवसीय आरोग्य मेळावा २५ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सुरू राहणार असून, यामध्ये मोफत रुग्ण तपासणी, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन भाविक व नागरिकांना मिळणार आहे. शेगाव येथे राष्ट्रपतींच्या आगमनानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. राष्ट्रपतींनी या प्रदर्शनीच्या माध्यमातून भारतीय आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) या क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed