• Fri. Mar 6th, 2026

    Karjat-Panvel Railway: कर्जत-पनवेल थेट लोकलने प्रवास, डोंगरातून बोगदा तयार; 29 किमी लांब मार्गिकेने 30 मिनिटांत होणार अंतर पार

    Karjat-Panvel Railway: कर्जत-पनवेल थेट लोकलने प्रवास, डोंगरातून बोगदा तयार; 29 किमी लांब मार्गिकेने 30 मिनिटांत होणार अंतर पार

    Karjat-Panvel Corridor: कर्जत ते पनवेलदरम्यान दुहेरी मार्गिकेचं काम सुरू आहे. यामध्ये 2.6 किमी लांब बोगद्याचा समावेश आहे. हा बोगदा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे. कर्जत ते पनवेल प्रवासाचा वेळ अवघ्या 30 मिनिटांवर येणार आहे.

    नवी मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये कर्जत आणि पनवेल स्थानकांना आता थेट जोडणी मिळणार आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात पनवेल – कर्जत कॉरिडोरवर 2.639 किमीच्या वावरले बोगद्याचं बांधकाम सुरू आहे. यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार आहे. शिवाय नवीन सुरू झालेल्या नवी मुंबई विमानतळालाही या मार्गाने थेट जोडणी मिळणार आहे.

    दुहेरी मार्गिकेनं अंतर कमी होणार

    कर्जत ते पनवेल रेल मार्ग एकूण 29.9 किमी लांब दुहेरी मार्ग आहे. मध्य रेल्वेवरील गर्दी कमी करून मुंबई ते नवी मुंबई व रायगडदरम्यानचं अंतर कमी करण्याच्या उद्देशाने ही मार्गिका तयार केली जात आहे. या अंतर्गत मुंबई उपनगरिय रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदाही बांधण्यात येत आहे. सह्याद्रीच्या डोंगरांमधून हा बोगदा तयार केला जात आहे. या दुहेरी मार्गिकेचं काम पूर्ण होताच, मुंबई उपनगरीय रेल्वेवरील भार कमी होणार आहे.Maharashtra TimesDighi Port to Pune: रायगड-पुणे प्रवासात वेळ वाचणार? ताम्हिणी घाटासाठी दोन पर्यायी मार्ग प्रस्तावित; 30 ते 50 किमी अंतर होणार कमी

    दरम्यान, कर्जत- पनवेल रेल्वे मार्गावर स्थानकांचा विस्तार सुरू आहे. हा मार्ग मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे यांचा संयुक्त प्रकल्प आहे. या मार्गावर काम प्रगतीपथावर सुरू असून लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या रेल्वे मार्गावर कर्जत, चौक, मोहोपाडा, रसायनी आणि पनवेल अशी स्थानकं असणार आहेत. हा रेल्वे मार्ग सुरू होताच कर्जत ते पनवेल प्रवास अवघ्या 30 मिनिटांत होणार आहे. कर्जत, भिवपूरी, नेरळ, खोपोलीपासून नवी मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    मार्च 2026ची डेडलाइन हुकणार?

    कर्जत ते पनवेल रेल्वे प्रकल्पामध्ये 9 प्रमुख पूल, 35 छोटो पूल, 15 अंडरपास , तीन मुख्य बोगदे आणि एका रेल्वे उड्डाणपुलाचा समावेस आहे. सर्वात आधी हा प्रकल्प डिसेंबर 2025मध्ये सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. ही तारीख पुढे ढकलून मार्च 2026 करण्यात आली होती. पण, फेब्रुवारी महिना उजाडला तरी अजून बरेच काम बाकी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

    Maharashtra TimesMumbai AC Local: एसी लोकलमुळे हार्बरचं वेळापत्रक कोलमडलं, महिन्याभरापासून सर्व गाड्या 20 मिनिटं विलंबाने; प्रवाशांची मोठी गैरसोय

    सध्या पनवेलजवळ या प्रकल्पासाठी इंटरचेंज आणि सिग्नलिंगचं काम सूरू आहे ते अंतिम टप्प्यात पोहचलं आहे. शिवाय पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं कामही सुरू आहे. ही मार्गिका सुरू होताच पनवेल रेल्वे स्थानक उपनगरीय रेल्वेवरील एक महत्त्वाचं इंटरचेंज बनणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा