• Fri. Mar 6th, 2026

    मंत्री नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात मोठा भ्रष्टाचार

    ByMH LIVE NEWS

    Feb 25, 2026
    मंत्री नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात मोठा भ्रष्टाचार

    मुंबई -ललिता पिल्लेवार

    राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदारसंघातील रासेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. रासेगावच्या विद्यमान सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

    नेमकी घटना काय?

    रासेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया सुरू होती. हा अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी आणि त्या प्रक्रियेत संबंधित सदस्याला मदत करण्याच्या बदल्यात सरपंच मंदा बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या मागणीबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीने तातडीने या तक्रारीची शहानिशा केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर झालेल्या तडजोडीत ही रक्कम २५ हजार रुपये देण्याचे ठरले.

    मिळालेल्या माहितीनुसार, २५ हजार रुपयांपैकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले होते. नाशिक एसीबीच्या पथकाने दिंडोरी परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जेव्हा विठ्ठल बेडकुळे आणि सरपंच मंदा बेडकुळे यांनी १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

    नरहरी झिरवळांचा पाय आणखी खोलात

    दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ हे विविध कारणामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापैकी ३५ हजार रुपये गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले होते. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर सापळा रचला. यानंतर त्यांनी राजेंद्र ढेरंग यांना पैसे स्वीकारताना ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर झिरवळ यांच्यावर टीका होत होती.

    यानंतर आता त्यांच्याच मतदारसंघातील आणि त्यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर किंवा लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने विरोधकांनी आता झिरवाळ यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. एसीबीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकातील अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed