• Sun. Jun 14th, 2026

    राज्यात 5 किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ByMH LIVE NEWS

    Feb 25, 2026
    राज्यात 5 किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

              राज्यात प्रत्येक नागरिकाला तो राहत असलेल्या ठिकाणापासून ५ किलोमीटरच्या अंतरावर सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. या आरोग्य सुविधा सुलभ व सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी खासगी क्षेत्रातील आणि धर्मदाय संस्थांच्यावतीने चालवण्यात येणारी रुग्णालये यांनी योगदान द्यावे,  अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासन २ हजार ४०० पेक्षा जास्त विविध आजारांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ देत आहे.  राज्यात प्रभावी आरोग्य सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदुजासारखे रुग्णालय राज्य शासनाला निश्चितच मदत करतील. देशाच्या फाळणीनंतर निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीत हिंदुजा समूहाने रुग्णसेवा सुरू केली. आज हिंदुजा समूहाची रुग्णालये देशातील नामांकित रुग्णालयांपैकी आहेत.  या रुग्णालयांमध्ये अनेक देशांमधून नागरिक उपचारासाठी येऊन बरे होऊन जातात.

    हिंदुजा विश्वस्तांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर समाज परिवर्तनाचे कार्य होत आहे. पालघर जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी या समूहाने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. रुग्णालयाच्या प्रयत्नांमुळे निश्चितच या भागात कुपोषणावर मात करण्यास मदत होत आहे. ‘जीव वाचवणे आणि निरोगी भारत निर्माण करणे’ सुरू केलेली ही देशव्यापी मोहीम हिंदुजा रुग्णालयाच्या आरोग्य क्षेत्रातील कामाचे मूर्तीमंत उदाहरण असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    क्षयरोगाचे जिवाणू औषधांना दाद न देण्याचा प्रकार (ड्रग रेजिस्टन्स) सर्वप्रथम हिंदुजा रुग्णालयाने  शोधला. हिंदुजा रुग्णालयाचे हेच संशोधन पुढे राष्ट्रीय स्तरावर  क्षयरोगाच्या प्रभावी उपचारासाठी धोरणाचा भाग बनले. टाईप वन मधुमेहामध्ये हिंदुजा समूहाच्यावतीने बालकांवर उपचाराचे मोठे काम केले जात असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काढले.

    हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी प्रास्ताविक केले.  त्यांनी प्रास्ताविकात समूहाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सुरू असलेले विविध कार्यही, संशोधन, उपचार पद्धती याविषयी  माहिती दिली.

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  हिंदुजा रुग्णालयाच्यावतीने त्यांच्या कार्यावर आधारित आयोजित चित्र प्रदर्शनीला भेट दिली आणि हिंदुजा समूहाच्या विविध कार्याची माहिती घेतली.

    कार्यक्रमाला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल,  खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा यांच्यासह हिंदुजा समूहाच्या  रुग्णालयांमधील डॉक्टर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed