• Fri. Mar 6th, 2026
    Raigad News: 15 फूट पाण्यात हरपला 12 वर्षांचा ओंकार; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, काय घडलं?

    कर्जतच्या तुंगी गावात १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरक्षा उपाययोजनांच्या अभावामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे.

    कर्जत तालुक्यातील तुंगी गावात जलजीवन मिशनच्या तलावात बुडून मुलाचा मृत्यू.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, कर्जत (रायगड) : कर्जत तालुक्यातील हंबरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तुंगी गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शासनाच्या ‘ जलजीवन मिशन ‘ अंतर्गत सुरू असलेल्या तलावाच्या बांधकामात १२ वर्षीय ओंकार उर्फ मुक्या भरत आसवले या निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. सुरक्षा उपायांचा अभाव की प्रशासनाची हलगर्जी, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

    तुंगी हे डोंगराळ व दुर्गम गाव अनेक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित होते. अलीकडेच येथे रस्ता व वीज पोहोचली असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत तलावाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या तलावात सुमारे १५ फूट पाणी साचलेले असतानाही परिसरात कोणतेही सुरक्षा कठडे, इशारा फलक किंवा संरक्षक जाळी उभारण्यात आली नव्हती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेले खोदकाम आणि निसरडी पायवाट यामुळे हा परिसर अधिक धोकादायक बनला होता.

    दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ओंकार हा गावालगतच्या तलाव परिसरात गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती न मिळाल्याने चिंता अधिकच वाढली. अखेर दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याचा मृतदेह तलावात आढळून आला. या घटनेने आसवले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    Maharashtra TimesAmbadas Danve : ‘ड्रायव्हरच्या नावे 1150 कोटी रुपये हडपण्याचा भुमरेंचा डाव’; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

    घटनेनंतर तुंगी गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “इशारा फलक नाही की कठडे नाहीत; अशा निष्काळजीपणामुळेच १२ वर्षांच्या मुलाचा जीव गेला,” असा आरोप नागरिकांनी केला. संबंधित ठेकेदार व यंत्रणेवर कारवाईची मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर घेराव घालून निषेध नोंदवला.

    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत कामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव असल्याचे समोर येत असल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकृत अहवालानंतरच नेमकी जबाबदारी निश्चित होणार आहे.

    Maharashtra TimesSolapur Crime : पोलीस पत्नीवर संशय, घटस्फोटाचा राग; जावयाने शेतातच सासऱ्याला निर्घृणपणे संपवलं

    जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतून ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उद्देश असताना, अशा दुर्घटनांमुळे या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विकासकामे सुरू असताना सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते, मात्र येथे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.

    तुंगीतील या दुर्घटनेने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झाले नाही, तर संपूर्ण गावाला वेदना दिल्या आहेत. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने तत्काळ जबाबदारी निश्चित करून सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा