• Sun. Mar 8th, 2026
    Nagpur Municipal Corporation : महापालिकेत महिला राज, स्थायी समितीसह इतर समित्यांवर 78 नगरसेविका

    नागपूर महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदी महिला नगरसेवकांची निवड झाल्यानंतर आता स्थायी समितीसह सर्व महत्त्वाच्या समित्यांची जबाबदारी महिलांच्या हाती सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये महिला राज आल्याची चर्चा आहे. ही एक स्तुत्य बाब असल्याचं देखील बोललं जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : नागपूर महापालिकेची सत्ता चवथ्यांदा मिळवणाऱ्या सत्ताधारी भाजपने स्थायी समितीसह सर्व महत्वाच्या समित्यांची जबाबदारी महिलांच्या हाती सोपवली आहे. तर दुसरीकडे १५१ सदस्यीय महापालिकेत तब्बल ७८ महिला नगरसेविकांना विविध समित्यांवर नियुक्त करत भाजपसह काँग्रेस, एमआयएम, इंडियन मुस्लीम लीग, शिवसेना (उबाठा), शिवसेना, बसप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तेसुद्धा महिला सक्षमीकरणाच्या बाबत कुठेही मागे नाहीत असा संदेश दिला आहे. मंगळवारी सुरेश भट सभागृहात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत भाजपने १६ सदस्यीय स्थायी समितीवर ११ महिला सदस्य दिल्या आहेत. तर परिवहन, जलप्रदायसह इतर सर्व महत्वाच्या समित्यांचे नेतृत्त्वही महिला नगरसेविकाच करणार आहे. त्यामुळे एकप्रकारे येत्या काळात महापालिकेवर महिला राज असल्याचे निश्चित झाले आहे.

    महापौर आणि उपमहापौरपदी महिला नगरसेविकांची निवड झाल्यानंतर स्थायी समितीचे सभापतीपद कोणत्या महिला नगरसेविकेकडे जाणार याची चांगलीच चर्चा होती. अखेर प्रभाग ३६ च्या नगरसेविका शिवानी दाणी यांच्याकडे शहराच्या तिजोरीच्या चाव्या सोपवण्यात आल्या आहेत. दाणी या नव्या स्थायी समिती सभापती असणार आहेत. विशेष म्हणजे स्थायी समितीवर सत्ताधारी पक्षाच्या वतीने पहिल्यांदाच सर्व सदस्य हे महिला देण्यात आले आहेत.

    स्थायी समितीत काँग्रेसला चार, एमआयएम आणि इडियन मुस्लीम लीग यांच्या मुस्लीम बहुजन विकास आघाडीला एक जागा मिळाली आहे. तर दुसरीकडे परिवहन सभापतीपदाची जबाबदारी मंगला खेकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दहा सदस्यीय परिवहन समितीत भाजपला आठ, काँग्रेसप्रणित नागपूर विकास आघाडीला तीन, मुस्लीम बहुजन विकास आघाडीच्या एका सदस्याची नियुक्ती झाली आहे.

    अशी असेल स्थायी समिती

    स्थायी समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांमध्ये भाजपच्या शिवानी दाणी- सभापती, तर सदस्य म्हणून भाजपच्या स्वीटी भिसीकर, प्रमिला गौर, विशाखा मोहोड, निरंजना पाटील, ममता ठाकूर, साधना बरडे, अभिजीत राजगिरे, शितल रारोकर, सानवी शेंडे, मानसी सिमले यांना संधी दिली आहे. तर काँग्रेकडून मेरिस्टेला उसरे, अभिजीत झा, वसीम खान, अभिषेक शंभरकर, मुस्लीम लीगकडून असलम खान मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    इतर समित्यांवरील सभापती

    परिवहन – मंगला खेकरे (भाजप), स्थापत्य व प्रकल्प- अश्विनी जिचकार (भाजप), वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती- मनीषा अतकरे (भाजप), विधी समिती- निधी तेलगोटे (भाजप), शिक्षण समिती- संतोषदेवी लढ्ढा (भाजप), गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी समिती- रुतीका मसराम (भाजप), क्रीडा समिती- दर्शनी धवड (भाजप), महिला व बालकल्याण समिती- सारिका नांदुरकर (भाजप), जलप्रदाय समिती- दिव्या धुरडे, कर आकारणी व कर संकलन समिती- सरीता कावरे, अग्निशम व विद्युत समिती- माया इवनाते

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा